राजस्थानच्या अलवर जिल्ह्यातील अलवर तुरुंगात अशी एक घटना घडली आहे ज्याची चर्चा संपूर्ण देशभरात सुरू आहे. गंभीर गुन्ह्यांत दोषी ठरलेले दोन कैदी एक महिला आणि एक पुरुष विवाहबंधनात अडकत आहेत. डेटिंग अॅपवर ओळख झालेल्या तरुणाच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा भोगणारी प्रिया सेठ ऊर्फ नेहा सेठ आणि पाच जणांच्या निर्घृण हत्येसाठी दोषी ठरलेला हनुमान प्रसाद, या दोघांना त्यांच्या विवाहासाठी राजस्थान उच्च न्यायालयाने 15 दिवसांचा आपत्कालीन पॅरोल मंजूर केला आहे.
advertisement
चित्रपटालाही लाजवेल अशी ही कथा सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. प्रिया सेठ उर्फ नेहा सेठ आणि तिचा प्रियकर हनुमान प्रसाद यांना त्यांच्या विवाहासाठी राजस्थान उच्च न्यायालयाने आपत्कालीन पॅरोल मंजूर केला आहे. आज अलवरमधील बरोडामेव येथे हा विवाह सोहळा पार पडला आहे.
मॉडेल असलेल्या प्रिया सेठला 2018 मध्ये झालेल्या एका खुनप्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. ती सध्या सांगानेर खुल्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. याच कारागृहात सुमारे सहा महिन्यांपूर्वी तिची ओळख हनुमान प्रसादशी झाली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळले.
प्रियाचा थरारक गुन्हा
प्रियावर असलेला खुनाचा आरोप 2018 सालचा आहे. 2 मे 2018 रोजी प्रियाने तिचा प्रियकर दिक्षांत कामरा आणि त्याचा मित्र लक्ष्य वालिया यांच्या मदतीने दुष्यंत शर्मा याची हत्या केली होती. प्रियाचा उद्देश दुष्यंतचे अपहरण करून खंडणी उकळण्याचा होता. या पैशांतून कामराचे कर्ज फेडण्याचा तिचा कट होता.
टिंडरवर ओळख वाढवल्यानंतर प्रियाने दुष्यंतला जयपूरमधील बजाज नगर येथील एका फ्लॅटमध्ये बोलावले. त्यानंतर त्याच्या वडिलांकडे 10 लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली. कुटुंबीयांनी कसाबसा 3 लाख रुपये जमा करून दिले. मात्र दुष्यंतला सोडल्यास तो पोलिसांपर्यंत पोहोचेल, या भीतीने प्रियाने आणि तिच्या साथीदारांनी त्याची हत्या करण्याचा निर्णय घेतला.
दुष्यंतची ओळख पटू नये म्हणून त्याच्या चेहऱ्यावर वार करण्यात आले. मृतदेह सूटकेसमध्ये भरून आमेरच्या डोंगराळ भागात फेकण्यात आला. पुरावे नष्ट करण्यासाठी फ्लॅट स्वच्छ करण्यात आला. 3 मे रोजी रात्री दुष्यंतचा मृतदेह सापडल्यानंतर काही दिवसांतच प्रिया, कामरा आणि वालिया यांना अटक करण्यात आली.
पाच जणांच्या हत्येचा आरोपी हनुमान प्रसाद
हनुमान प्रसादवरही अतिशय गंभीर गुन्ह्याचा शिक्का आहे. त्याने आपल्या प्रेयसीच्या कुटुंबातील पाच जणांची निर्घृण हत्या केल्याचा आरोप सिद्ध झाला आहे. त्याची प्रेयसी संतोष ही अलवरमधील तायक्वांडो खेळाडू होती आणि ती त्याच्यापेक्षा वयाने 10 वर्षांनी मोठी होती.
2 ऑक्टोबर 2017 च्या रात्री संतोषने हनुमानला घरी बोलावून आपल्या पती बनवारीलाल आणि मुलांची हत्या करण्यास सांगितले. हनुमान एका साथीदारासह तेथे पोहोचला आणि प्राण्यांची कत्तल करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चाकूने बनवारीलाल यांची हत्या केली.
हा प्रकार पाहून संतोषची तीन मुले आणि तिचा पुतण्या जागे झाले. पकडले जाण्याच्या भीतीने संतोषनेच आपल्या मुलांची आणि पुतण्याची हत्या करण्यास सांगितले. त्या रात्री चार मुले आणि एक प्रौढ अशा पाच जणांची हत्या झाली. अलवर जिल्ह्यातील या घटनेने संपूर्ण राज्य हादरले होते.
