निर्दोष तरुणाचं आयुष्य वेठीला
गेल्या वर्षी ४ सप्टेंबर रोजी सुशांतला अटक झाली आणि या वर्षी ९ सप्टेंबर रोजी त्याची सुटका झाली. ही एक वर्षाची कैद केवळ छोट्या चुकीमुळे त्याच्या नशिबी आली. सुशांत जेलमध्ये असतानाच त्याच्या घरी कन्यारत्न जन्माला आले. आपल्या बाळाला त्याने पहिल्यांदा पाहिले तेव्हा ती सहा महिन्यांची झाली होती. 'मी जेलमध्ये असतानाच अनायाने तिचं पहिलं पाऊल टाकलं,' हे सांगताना सुशांतच्या डोळ्यातील अश्रू आले. 'कोणताही आदेश, कितीही पैसा ओतला तरी... तो गेलेला वेळ मला परत देऊ शकत नाही, अशी संतापजनक प्रतिक्रिया त्याने व्यक्त केली . एका पित्याचे आयुष्य एका चुकीने कसे उद्ध्वस्त झाले, याचे हे बोलकं उदाहरण आहे.
advertisement
जबाबदारी कोणाची?
शहडोलचे जिल्हाधिकारी केदार सिंह यांनी मूळ आरोपीच्या जागी चुकीने सुशांतचे नाव आदेशात टाइप केले. अधिकाऱ्यांनी या गंभीर चुकीला केवळ 'टायपिंग एरर' म्हणून सोडून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, या चुकीमुळे सुशांतच्या पत्नीला एकट्याने संघर्ष करावा लागला, त्याच्या आई-वडिलांना खटला लढवण्यासाठी कर्ज काढावे लागले. आज या चुकीच्या शिक्षेमुळे त्याच्या नोकरीच्या संधीही बंद झाल्या. प्रशासनाच्या या निर्बुद्ध कामाची जबाबदारी कोण घेणार? नुकसान कोण भरुन काढणार असा सवालही त्याने उपस्थित केला.
न्यायालयाचा 'टायपिंग' करणाऱ्या यंत्रणेला दणका
जेव्हा हे प्रकरण मध्य प्रदेश उच्च न्यायालयात पोहोचलं, तेव्हा न्यायालयाने प्रशासनाच्या कामावरच ताशेरे ओढले. अगदी निर्बुद्धपणे सरधोपट काम केल्याचे ताशेरे ओढण्यात आले. कोर्टाने सुशांतच्या त्वरित सुटकेचे आदेश दिले. एवढंच नाही, तर जिल्हाधिकारी केदार सिंह यांना न्यायालय अवमानना नोटीस जारी करण्यात आली. आदेशाची योग्य तपासणी न केल्याबद्दल कोर्टाने राज्य सरकारलाही फटकारले.
न्यायालयाने केवळ सुटकाच केली नाही, तर या निष्काळजीपणाची किंमत प्रशासनाला मोजावी लागली पाहिजे, अशी भूमिका घेतली. कोर्टाने जिल्हाधिकारी केदार सिंह यांना स्वतःच्या खिशातून सुशांतला नुकसान भरपाई म्हणून २ लाख रुपये देण्याचे निर्देश दिले. लाखो रुपयांची ही नुकसान भरपाई सुशांतला मिळाली असली तरी, एका निर्दोष व्यक्तीचे आयुष्य आणि एका पित्याचा आपल्या मुलीसोबतचा गेलेला वेळ, याच्या तुलनेत ही रक्कम कमीच आहे. प्रशासनाची एक छोटीशी चूक कशी एका साधारण माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकते हे जीवंत उदाहरण मध्य प्रदेशातील शहडोल जिल्ह्यात पाहायला मिळालं.
