गंगोत्री धामला जाताना मुख्य थांबा असलेल्या धराली येथील खीर गंगा नदीला पूर आला आहे. पुरामुळे जवळपास 50 हॉटेल्स आणि होमस्टे उद्ध्वस्त झाले आहेत. स्थानिक लोकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली 10 ते 12 कामगार अडकल्याची भीती आहे. प्रत्यक्षदर्शी राजेश पनवा यांनी सांगितले की, खीर गंगेच्या पाणलोट क्षेत्रात कुठेतरी ढग फुटला आहे, ज्यामुळे हा विनाशकारी पूर आला आहे. पुरामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
advertisement
पुरामुळे धाराली बाजारपेठेचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक नागरिक घरे सोडून सुरक्षित ठिकाणी जात आहेत. पुरामुळे खीर गंगेच्या काठावर असलेले प्राचीन कल्प केदार मंदिरही ढिगाऱ्याखाली गेल्याचे वृत्त आहे.
या दुर्देवी घटनेची माहिती समजताच SDRF, स्थानिक पोलीस आणि महसूल विभागाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या बचावकार्य वेगात सुरू आहे.
अमित शहांचा फोन
उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांसोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पुष्करसिंह धामी यांच्याशी फोनवर चर्चा केली आहे. धराली गावामध्ये झालेल्या नुकसानीच्या मुद्द्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे.