हैदराबादच्या चंचलगुडा भागातल्या एका झोमॅटो डिलिव्हरी एजंटने या इंधन संकटावर जरा हटके उपाय शोधला आहे. एकीकडे इंधन नसल्याने चालकांनी पेट्रोल पंपांवर रांगा लावल्या आहेत, अनेक गाड्या पेट्रोल पंपावर अडकून पडल्या आहेत. या कठीण काळात या डिलिव्हरी एजंटने वेगळीच शक्कल लढवली. ग्राहकांनी ऑर्डर केलेले पदार्थ वेळेवर पोहोचवण्यासाठी त्याने गाडी सोडून घोडा निवडला. घोड्यावर बसून तो शहरात फूड डिलिव्हरीसाठी गेला.
advertisement
झोमॅटोचा डिलिव्हरी एजंट इम्पीरियल हॉटेलजवळच्या गर्दीच्या रस्त्यावरून घोड्यावर बसून फूड डिलिव्हरीला जात होता. तो रस्त्यावरून जात असताना तिथे उपस्थित असलेल्या कुणी तरी या एजंटचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. त्यानंतर हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. घोड्यावर बसलेला एजंट लाल रंगाची झोमॅटो बॅकपॅक घेऊन होता. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. ट्रक चालकांनी पुकारलेल्या वाहतूक संपामुळे पेट्रोल पंपावर इंधन टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे एजंटला घोड्यावरून फूड डिलिव्हरी करायला जावं लागलं.
दरम्यान, ऑल-इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसने मंगळवारी उशिरा (AIMTC) ट्रकचालकांचा संप मागे घेतला आहे. हा संप नवीन कायद्याला विरोध करण्यासाठी होता. ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या शिष्टमंडळाची मंगळवारी केंद्रीय गृह सचिवांसोबत चर्चा झाली. त्यानंतर नवीन मोटर वाहन कायद्यातील शिक्षा आणि दंडाच्या नव्या तरतुदी लागू होणार नाही, असं केंद्र सरकारने स्पष्ट केलंय. त्यामुळे आता मालवाहतूकदार, टँकर चालकांचा संप मागे घेण्याचा निर्णय झाला. नवीन कायद्यात अपघातानंतर पळून जाणाऱ्या चालकांना 10 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि जीवघेण्या अपघातात सहभागी असलेल्या चालकांना दंडाची तरतूद आहे.