थायलंडमधील बँकॉक येथून निघालेले बोईंग 737-800 जेट हे विमान धावपट्टीवरून घसरले. विमानाचं लँडींग करत असताना लँडिंग गियर उघडले नसल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजून 7 मिनिटांनी हे विमान मुआन विमानतळावर उतरण्याचा प्रयत्न करत होतं. विमान धावपट्टीवर उतरलं असतानाही विमानाचे लँडिंग गिअर उघडले नाहीत. त्यामुळे विमानावरील पायलटचं नियंत्रण हरवून हा अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. हे विमान एका काँक्रीटच्या भिंतीला धडकून आगीचा भडका उडाला.
advertisement
सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो आणि व्हिडीओमधून आगीचा हा थरार स्पष्टपणे दिसून येत आहे. विमान धावपट्टीवर उतरल्यानंतर अवघ्या १० सेकंदात विमान क्राँकीटच्या भिंतीवर आदळलं आणि पुढच्याच क्षणात आगीचा भडका उडाला. या विमानात 175 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. यातील 173 प्रवासी दक्षिण कोरियाचे होते तर आणि दोन थाई नागरिक होते. या अपघातात 179 जणांचा होरपळून मृत्यू झाल्याचं मानलं जात आहे.
या अपघातात केवळ दोघे वाचल्याची माहिती असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जे दोघे वाचले आहेत, त्यात एक प्रवासी आणि एक क्रू मेंबर आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत एकूण 85 जणांचा मृत्यू झाल्याचं कन्फर्म करण्यात आलं आहे. यात 46 महिला आणि 39 पुरुष असल्याची माहिती दिली आहे. तर अद्याप बेपत्ता झालेल्यांचे मृतदेह शोधून बाहेर काढण्याचं काम बचाव दलाकडून केलं जात आहे.
