बुधवारी अझरबैजान एअर लाइन्सची फ्लाइट J2-8243 कझाकस्तानमधील अक्ताऊ येथे क्रॅश झाली. असा दावा केला जात आहे की, हे विमान रशियाच्या दिशेनं जात असताना युक्रेनने या भागात ड्रोन हल्ले केले होते. या ड्रोन हल्ल्यांना रशियन हवाई संरक्षण दलाकडून प्रत्युत्तर दिलं जात होतं. अपघातानंतर समोर आलेल्या फोटोंमध्ये विमानाच्या बाहेरून अनेक लहान छिद्रे असल्याचं दिसून आले, जे कदाचित क्षेपणास्त्राच्या तुकड्यांमुळे झाले असावे, असा अंदाज आहे. या अपघातात दोन पायलट आणि क्रू मेंबर्ससह 38 जणांचा मृत्यू झाला.
advertisement
या दुर्घटनेनंतर अझरबैजान एअरलाइन्सने सर्वेक्षण केले असून रशियन एअर डिफेन्सने चुकून विमानावर हल्ला केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या क्षेपणास्त्र प्रणालीद्वारे हा हल्ला करण्यात आला. आता रशियाने हे आरोप मान्य केले आहेत. आधी त्यांनी युक्रेनला दोष देण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, युक्रेनने आरोप फेटाळून लावले आणि चौकशीची मागणी केली होती.
व्लादिमीर पुतीन यांनी काय म्हटलं?
पुतीन यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी या दुःखद घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे आणि पुन्हा एकदा मृतांच्या कुटुंबियांबद्दल शोक व्यक्त केला आहे. जखमींना लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी प्रार्थना केली आहे. ज्यावेळी विमानावर हल्ला झाला, तेव्हा युक्रेनने ग्रोझनी, मोझडोक आणि व्लादिकाव्काझ या भागात ड्रोन हल्ले केले होते, याला प्रत्युत्तर देताना चुकून अझरबैजानच्या विमानावर क्षेपणास्त्र सोडण्यात आलं.
