रायगडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची कार्यकारणी आढावा बैठक झाली. या बैठकीत बोलताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी पालकमंत्री पदावर भाष्य केले.
अदिती तटकरे यांनी काय म्हटले?
"राजकीय गैरसमजुतींमुळे रायगड जिल्ह्याला पालकमंत्रीपद मिळाले नाही, परिणामी जिल्हा नियोजन समितीची बैठकच होत नाही, आणि निधीअभावी अनेक कामे रखडत आहेत," अशी खदखद महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. रोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ची जिल्हा कार्यकारिणी आढावा सभा पार पडली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
advertisement
सभेत बोलताना आदिती तटकरे यांनी रायगडच्या विकासासंबंधी गंभीर चिंता मांडल्या. "फक्त पालकमंत्री नाही, म्हणून एकूणच विकासात्मक निर्णय, निधी वितरण आणि प्राधान्यक्रम ठरवणं कठीण होतं आहे. इतर तालुक्यांतील राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायतींनाही याचा फटका बसतोय. हे अन्यायकारक असल्याचे अदिती तटकरे यांनी म्हटले.
तटकरे म्हणाल्या, "महायुतीमधील तिन्ही वरिष्ठ नेते पालकमंत्रीपदाबाबत योग्य वेळी निर्णय घेतीलच, याबाबत विश्वास आहे. पण तोपर्यंत तरी रायगड जिल्ह्याला विकासापासून वंचित ठेवू नका, अशी विनंती मी करत असल्याचे त्यांनी म्हटले.
पालकमंत्री पदावरून तटकरे-गोगावले यांच्यात आरोप-प्रत्यारोप...
रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादीचे खासदार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडत आहेत. रायगडमधील एकमेकांविरोधातील राजकीय प्रतिस्पर्धी असलेल्या तटकरे-गोगावले वादाने राजकीय वातावरण चांगलेच पेटले आहे. आगामी निवडणुकीत रायगडमध्ये राष्ट्रवादी विरोधात युती नकोच अशी भूमिका शिंदे गटाकडून घेण्यात येत आहे.