Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव स्कॉर्पिओचा चुराडा, मृत्यूचा दाढेतून वाचले तिघे पण एकानं गमावला जीव, PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पुणे-सोलापूर महामार्गावर प्रयागधाम फाट्याजवळ स्कॉर्पिओ अपघातात गोरख त्र्यंबक माने यांचा मृत्यू, अलिकेश खान, विजय सूर्यकांत माने, समाधान अंकुश बाबर गंभीर जखमी.
advertisement
1/7

सुमित सावंत, प्रतिनिधी उरुळी कांचन: पुणे-सोलापूर महामार्गावरील प्रवास पुन्हा एकदा रक्ताने माखला आहे. उरुळी कांचन येथील प्रयागधाम फाट्याजवळ मध्यरात्री झालेल्या एका भीषण अपघातात स्कॉर्पिओचा अक्षरशः चक्काचूर झाला. चालकाचे नियंत्रण सुटल्याने वेगात असलेली गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.
advertisement
2/7
या भीषण धडकेत गोरख त्र्यंबक माने या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांचे तीन मित्र गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, स्कॉर्पिओमधून चार मित्र प्रवास करत होते. गाडीचा वेग मर्यादेपेक्षा जास्त असावा, असा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे.
advertisement
3/7
प्रयागधाम फाट्याजवळ गाडी येताच चालकाला वेगावर नियंत्रण मिळवता आले नाही. गाडी रस्त्यावरून घसरली आणि कडेला असलेल्या एका मोठ्या झाडावर भीषण वेगाने जाऊन धडकली. धडक इतकी जोरात होती की, गाडीचा पुढचा भाग पूर्णपणे चेपला गेला आणि इंजिनचा भाग आत शिरला.
advertisement
4/7
या भीषण अपघातात गोरख त्र्यंबक माने यांना गंभीर दुखापत झाली. गाडीच्या पत्र्यात अडकल्यामुळे आणि डोक्याला जबर मार बसल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर अलिकेश खान, विजय सूर्यकांत माने आणि समाधान अंकुश बाबर हे तिघे रक्ताच्या थारोळ्यात गाडीत अडकले होते.
advertisement
5/7
अपघाताचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि महामार्ग पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. पत्रे कापून जखमींना बाहेर काढण्यात आले आणि जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. या तिघांचीही प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
advertisement
6/7
अपघाताची बातमी समजताच मृताच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेतली. हसतं-खेळतं कुटुंब एका रात्रीत उध्वस्त झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्या गाडीने हे चौघे आनंदाने प्रवासाला निघाले होते, तीच गाडी त्यांच्यासाठी काळ ठरेल, असे कोणालाही वाटले नव्हते.
advertisement
7/7
महामार्गावर वाहनांचा वेग आणि ताबा सुटल्याने होणारे अपघात आता चिंतेचा विषय ठरत आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी याप्रकरणी घटनेचा पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र, या घटनेने उरुळी कांचन परिसरावर शोककळा पसरली आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/महाराष्ट्र/
Accident: पुणे-सोलापूर महामार्गावर भरधाव स्कॉर्पिओचा चुराडा, मृत्यूचा दाढेतून वाचले तिघे पण एकानं गमावला जीव, PHOTO