Weather Alert: स्वेटर आणि रेनकोट दोन्ही तयार ठेवा! नवीन वर्षात विचित्र हवामान, 2 जानेवारीला अलर्ट
- Reported by:Namita Suryavanshi
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवाड्यात हवामानात विचित्र बदल जाणवत आहेत. थंडीचा कडाका कायम असतानाच काही ठिकाणी पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे.
advertisement
1/5

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राच्या हवामानात अनपेक्षित बदल पाहायला मिळत आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहात सातत्याने बदल होत असल्याने राज्यात कधी थंडीचा जोर, तर कधी तापमानात किंचित वाढ असा मिश्र अनुभव येत आहे. गेले काही दिवस राज्यभर थंडी तीव्र होती, मात्र नववर्षाच्या पहिल्याच दिवसांत मुंबईसह काही भागांत थंडी आणि पावसाचं दुर्मिळ संमेलन पाहायला मिळालं. त्यामुळे स्वेटर की रेनकोट, असा संभ्रम मुंबईकरांमध्ये निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर 2 जानेवारी रोजी राज्यातील हवामान कसं राहील, याकडे लक्ष लागलं आहे.
advertisement
2/5
मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि कोकण पट्ट्यात थंडीचा प्रभाव कायम असून त्यात अधूनमधून हलक्या सरींची भर पडण्याची शक्यता आहे. 1 जानेवारीच्या पहाटे बोरिवलीपासून मध्य रेल्वे मार्गावरील कुर्ला, घाटकोपर, ठाणे परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडल्याने गारवा अधिक वाढला. हवामान विभागानुसार 2 जानेवारी रोजी मुंबईत आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील, मात्र पहाटे किंवा रात्रीच्या वेळी काही ठिकाणी बारीक सरी पडू शकतात. शहरात कमाल तापमान सुमारे 29 ते 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 17 ते 18 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. ठाणे, नवी मुंबई आणि पालघरमध्येही अशीच स्थिती असून थंडीचा जोर अधिक जाणवेल.
advertisement
3/5
पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागात थंडीचा प्रभाव अजूनही वाढतच आहे. पुण्यात 2 जानेवारी रोजी कमाल तापमान सुमारे 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पहाटेच्या वेळी शहरासह ग्रामीण भागात धुक्याची शक्यता असून त्यामुळे थंडी अधिक बोचरी जाणवू शकते. हवामान कोरडं राहणार असलं तरी सकाळच्या वेळेत गारठा कायम राहील. पुण्याच्या आसपासच्या ग्रामीण भागांत तापमान तुलनेने कमी राहणार असून थंडीचा प्रभाव शहरापेक्षा अधिक जाणवण्याची शक्यता आहे.
advertisement
4/5
मराठवाडा आणि विदर्भात तापमानात किंचित वाढ जाणवत असली, तरी थंडी पूर्णतः ओसरलेली नाही. मराठवाड्यात हवामान कोरडं राहणार असून छत्रपती संभाजीनगरमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. विदर्भात थंडीचा जोर अधिक जाणवेल. नागपूरमध्ये कमाल तापमान सुमारे 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअसपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान 8 अंश सेल्सिअसपर्यंत खाली गेल्याने पहाटे गारवा तीव्र जाणवत आहे.
advertisement
5/5
एकंदरीत राज्याचा विचार करता, तापमानात चढ-उतार सुरू असले तरी थंडीचा प्रभाव अजून काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. मुंबईसारख्या किनारी भागांत थंडीबरोबर हलक्या सरींची शक्यता असली, तरी अंतर्गत भागांत हवामान कोरडं आणि थंड राहील. पहाटेचा गारवा, रात्रीची थंडी आणि दिवसभर सौम्य तापमान असा मिश्र हिवाळी अनुभव राज्यभर पाहायला मिळणार आहे.
मराठी बातम्या/फोटोगॅलरी/मुंबई/
Weather Alert: स्वेटर आणि रेनकोट दोन्ही तयार ठेवा! नवीन वर्षात विचित्र हवामान, 2 जानेवारीला अलर्ट