वायनाडमधून लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी विजय मिळवला होता. पण त्यांनी रायबरेलीतून खासदार राहण्याचा पर्याय निवडलाय. यामुळे आता वायनाडमध्ये पोटनिवडणूक होत आहे. या जागेवर राहुल गांधी यांची बहीण प्रियांका गांधी मैदानात उतरतील. आतापर्यंत पडद्यामागे राहिलेल्या प्रियांका गांधी पहिल्यांदाच थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.
राहुल गांधी यांनी वायनाडमधून 2019 ची लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यांना तेव्हा अमेठीत पराभवाचा धक्का बसला होता. तर आता 2024 च्या निवडणुकीत राहुल गांधी वायनाड आणि रायबरेलीत जिंकून आले. त्यांना वायनाड ऐवजी रायबरेलीचा खासदार होण्याचा पर्याय निवडला.
advertisement
राहुल गांधी यांनी वायनाडची खासदारकी सोडल्यामुळे ही जागा रिक्त झालीय. या जागी प्रियांका गांधी मैदानात उतरणार आहेत. वायनाड हा काँग्रेससाठी सुरक्षित मतदारसंघ असून तिथं मुस्लीम मतदार असल्याचा आरोप भाजपकडून केला जातो. 2008 मध्ये मतदारसंघ पुनर्रचना केल्यानंतर वायनाड मतदारसंघ अस्तित्वात आला. या निवडणुकीत आतापर्यंत काँग्रेसनेच बाजी मारलीय.
प्रियांका गांधी गेल्या तीन दशकांपासून राजकारणात सक्रीय आहेत. पण त्यांनी कोणतीही निवडणूक मात्र लढवलेली नाही. पहिलीच निवडणूक त्या वायनाडमधून लढणार आहेत. वायनाड हा केरळमधला जिल्हा असून यात मल्लप्पुरम आणि कोझीकोड जिल्ह्यातील काही भाग आहे. वायनाड जवळपास 50 टक्के हिंदू तर 21 टक्के ख्रिश्चन आणि 29 टक्के मुस्लिम आहेत. पण वायनाड मतदारसंघाबाबत बोलायचं तर 48 टक्के मुस्लिम मतदार आणि ४१ टक्के हिंदू मतदार आहेत.