मृत तरुणाचे नाव विक्रम उर्फ बबलू नवनाथ कोळपे (वय 23 रा. रुई बयाजीनगर, ता. बारामती) असे आहे. विक्रमचे मामा सत्यवान आप्पा इंगळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तरुणी आणि तिच्या पालकांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 108, 351(2), 351(3), 352 आणि 3(5) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम आणि तरुणी यांच्यात गेल्या पाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. सुरुवातीला तरुणीने विक्रमला लग्नाचे आश्वासन दिले होते. मात्र, नंतर घरच्यांचा विरोध असल्याचे सांगत तिने लग्नास नकार दिला. त्यानंतर 27 डिसेंबर 2025 पासून तरुणी व तिची बहीण यांनी विक्रमला वारंवार फोन करून मानसिक त्रास देणे व ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली, असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
advertisement
नातेवाईकांना फोन करून दमदाटी
फिर्यादीनुसार, विक्रमला पुण्यात बोलावून त्याच्या मोबाईलमधील फोटो आणि चॅटिंग जबरदस्तीने डिलीट करण्यात आले. तसेच, जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तरुणीच्या वडिलांनी विक्रमच्या नातेवाईकांना फोन करून दमदाटी केल्याचेही सांगण्यात आले आहे.
सुसाईड नोटमध्ये काय म्हणाले?
दरम्यान, 15 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी विक्रमने आपल्या राहत्या घरातील किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी त्याने लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आई मला माफ कर.... मला ब्लॅकमेल करून खूप मानसिक त्रास दिला जात आहे. त्यामुळे मी हा निर्णय घेत आहे, असा उल्लेख असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या चिठ्ठीत संबंधित व्यक्तींनी दिलेल्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख असल्याचेही समोर आले आहे.
घटनेमुळे परिसरात हळहळ
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल आनंद कदम करत असून, सर्व बाबींची सखोल चौकशी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
