पुणे : पोलिसांची कर्तव्य दक्षता आणि समयसूचकतेमुळे अनेक गंभीर प्रसंग टळत असतात. अशीच एक स्तुत्य घटना पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या वाहतूक विभागात घडली. अंमलदार नीलम चव्हाण आणि रेश्मा शेख या हिंजवडी वाहतूक विभागात वाकड नाका येथे ड्युटीवर होत्या. त्याच वेळी, एका महिलेला प्रसूती वेदना होत असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांनी तात्काळ त्या महिलेला मदतीचा हात पुढे केला. वेळेत डॉक्टर किंवा रुग्णवाहिका पोहोचणार नाही, हे लक्षात आल्यावर त्यांनी महिलेला धीर देत रस्त्याच्या कडेलाच तिची प्रसूती केली.
advertisement
चांदे-नांदे भागातून एक महिला रिक्षातून प्रसूतीसाठी जात होती. मात्र अचानक पोटदुखी वाढल्याने तिला रस्त्यात थांबावे लागले. मदतीसाठी आवाज दिल्यावर वाहतूक पोलीस तिथे धावून आले. त्यांनी तिला एका शेडमध्ये नेऊन योग्य त्या पद्धतीने मदत केली. या वेळी राजश्री या महिलेने एका गोंडस मुलाला रस्त्यावरच जन्म दिला. प्रसूतीनंतर त्यांनी बाळाची आणि आईची काळजी घेतली आणि 108 रुग्णवाहिकेमार्फत तिला औंध रुग्णालयात पाठवले, अशी माहिती अंमलदार रेश्मा शेख यांनी दिली.
“हा प्रसंग खूपच भीतीदायक होता. मात्र, त्या महिलेला मदतीला गेलो तेव्हा कर्तव्य विसरून फक्त माणूस म्हणून काम केले. महिला असल्यामुळे तिची व्यथा समजली आणि सर्वतोपरी मदत केली. त्यामुळेच आज आमचं कौतुक होत आहे,” असे नीलम चव्हाण यांनी सांगितले.
“आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करत राहणार. एका महिलेला मदत करता आल्याचा आनंद आम्हाला आहे,” असेही त्यांनी नमूद केले.
या घटनेमुळे या दोन महिला पोलिसांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. पोलीस खात्याचा हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे आयुक्त विनयकुमार चौबे यांनी त्या दोघींना गौरविले. पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनीही या घटनेची प्रशंसा केली. सध्या पोलीस दलात त्यांच्या कामगिरीची चांगलीच चर्चा आहे.