स्वतःच्या मालकीची बैलजोडी खरेदी करणार
देहू येथील संत तुकाराम महाराज संस्थानने आता पालखीचा चांदीचा रथ आणि चौघड्याची गाडी ओढण्यासाठी स्वतःच्या मालकीची बैलजोडी खरेदी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यामुळे, अनेक वर्षांपासून रथ ओढण्यासाठी शेतकऱ्यांच्या बैलांना मिळणारा मान आता खंडित होणार आहे.
18 जून रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान
advertisement
जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी 18 जून रोजी देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे आणि या सोहळ्याच्या तयारीला वेग आला आहे. नुकत्याच झालेल्या श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या बैठकीत, संस्थेच्या आवश्यकतेनुसार दोन सशक्त बैलजोड्या पालखी रथासाठी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला. याव्यतिरिक्त, चौघड्याच्या गाडीसाठी देखील एक सर्वसाधारण बैलजोडी खरेदी केली जाईल.
प्रथा यावर्षीपासून थांबणार
यापूर्वी, पालखी पंढरपूरकडे मार्गक्रमण करत असताना, रथाला जुंपण्यासाठी पुणे जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांच्या बैलजोड्यांचा उपयोग केला जात असे, जो एक प्रकारचा सन्मान मानला जाई. यासाठी देहू देवस्थान संस्थान शेतकऱ्यांकडून अर्जही मागवत असे. मात्र, आता स्वतःच्या बैलजोड्या खरेदी केल्यामुळे ही प्रथा यावर्षीपासून थांबणार आहे.
यंदा अर्जही नाही?
पंढरपूरला जाण्यासाठी पालखी रथात विराजमान होतात. हा रथ ओढण्यासाठी पुणे जिल्ह्यातून विविध बैलजोड्यांना मान दिला जात होता. मात्र, यंदा बैलजोडी खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पालखी रथाच्या बैलजोड्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन देहू देवस्थान संस्थानच्या वतीने करण्यात येत असे.
संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष म्हणतात...
दरम्यान, पालखी रथासाठी दोन आणि चौघडा गाडीसाठी एक अशा तीन बैलजोड्या देवस्थान खरेदी करणार आहे. बदल म्हणून हा निर्णय घेतला आहे. पालखी रथास जोडण्यासाठी कोल्हापूर, सातारा आणि कर्नाटकच्या बाजारपेठेत जाऊन बैलांची पाहणी करून तीन जोड्या विकत घेतल्या जाणार आहेत. या बैलजोड्या शेतकऱ्यांकडूनच खरेदी करण्यात येणार आहेत. बैलांचा सांभाळ देवस्थान करणार आहे, असं जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे यांनी म्हटलं आहे.
