या हत्येनंतर आयुषची आई कल्याणी कोमकरने आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल केला होता. पण हा गुन्हा दाखल व्हायच्या आधीच आंदेकर कुटुंब फरार झालं. एकीकडे गणेश उत्सव आणि दुसरीकडे पुण्यात झालेली ही हत्या, यामुळे आरोपींना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर होतं. पोलिसांच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात होतं. आता अखेर सोमवारी मध्यरात्री पोलिसांनी आंदेकर टोळी विरोधात मोठी कारवाई केली आहे.
advertisement
या प्रकरणी पोलिसांनी एकूण सहा जणांना अटक केली आहे. यापूर्वी यश पाटील आणि अमित पोटोळे असं दोघांना अटक केली होती. आता अटकेतील आरोपींचा आकडा आठवर पोहोचला आहे. पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा महाराष्ट्राबाहेरून बंडू आंदेकर याच्यासह स्वराज वाडेकर, तुषार वाडेकर, त्यांची आई आणि इतर दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
या अटकेनंतर सर्व आरोपींना पुण्यात आणण्याची प्रक्रिया पूर्ण केली जात आहे. आयुषची हत्या झाल्यापासून आंदेकर कुटुंब फरार होतं. ते कुठे आहेत? याचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता. मात्र पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली. मागील तीन दिवस पोलिसांनी आरोपींवर पाळत ठेवली. गणेश उत्सव आणि आयुषचा अंत्यसंस्कार या दोन्ही घटना शांततेत पार पाडल्या. यानंतर आंदेकर टोळीच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पण या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
आयुष कोमकर हत्या प्रकरणी कोणावर गुन्हे दाखल आहेत?
गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आंदेकर (वय ६०) याच्यासह कृष्णा उर्फ कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (वय ४१), शिवम उर्फ शुभम सूर्यकांत आंदेकर (वय ३१), अभिषेक उदयकांत आंदेकर (वय २१), शिवराज उदयकांत आंदेकर (वय २९), लक्ष्मी उदयकांत आंदेकर (वय ६०), वृंदावनी निलंजय वाडेकर (वय ४०), तुषार निलंजय वाडेकर (वय २६), स्वराज निलंजय वाडेकर (वय २२), अमन युसुफ पठाण उर्फ खान, सुजल राहुल मेरगु (वय २३), यश सिद्धेश्वर पाटील आणि अमित प्रकाश पाटोळे (वय १९) अशा १३ जणांचा समावेश आहे.