या हत्येनंतर आता वनराजच्या खूनातील आरोपी समीर काळेचा भाऊ गणेश काळेला आंदेकर टोळीने टार्गेट केलं. या दोन हत्याकांडामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. येत्या काळात शहरातील गँगवॉर आणखी भडकण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान आता आंदेकर टोळीचा ९ नंबरचा पॅटर्न समोर आला आहे. खरं तर, ज्यावेळी वनराज आंदेकरची हत्या झाली होती. तेव्हा आंदेकर टोळीने बदला घेण्याची शपथ घेतली होती. वनराजच्या हत्येनंतर तब्बल १ वर्ष आंदेकर टोळीने काहीच केलं नाही. पण त्यानंतर दोन खून केले आहेत.
advertisement
आंदेकर टोळीचा पॅटर्न नक्की काय आहे?
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आयुष कोमकर आणि गणेश काळे हत्या प्रकरणात अनेक गोष्टी साम्य आहेत. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा आयुष कोमकरची हत्या झाली होती. तेव्हा तो हल्ला चार जणांनी केला होता. प्रत्यक्षात दोघांनी हल्ला केला. पण इतर दोघे प्रमुख हल्लेखोरांना कव्हर देत होते. गणेश काळे प्रकरणात देखील अशाप्रकारे चार जणांनी हल्ला केला.
यातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आधी गोळीबार करायचा आणि मग कोयत्याने वार करायचे, हा आंदेकर टोळीचा हत्येचा पॅटर्न असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान आता आंदेकर टोळीचा हत्येचा पॅटर्न नऊ नंबरमध्ये दडल्याची देखील चर्चा आहे.
9 नंबरमध्ये आंदेकर टोळीचं गूढ दडलंय?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा आयुष कोमकरची हत्या झाली. तेव्हा हल्लेखोरांनी त्याच्यावर ११ ते १२ गोळ्या झाडल्या होत्या. यातील नऊ गोळ्या आयुषला लागल्या होत्या. त्याच्या शरीराची चाळण बनून तो रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. यानंतर आता गणेश काळेवर देखील हल्लेखोरांनी नऊ गोळ्या झाडल्या आहेत. त्यामुळे आंदेकर टोळी नऊ गोळ्या झाडूनच खूनाचा बदला घेत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आता तीन आरोपींना अटक केली आहे. सर्वांना ६ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
