स्वप्न उराशी अन् संघर्षाची वाट
अहिल्यानगरच्या एका छोट्या गावातून आलेल्या बापूसाहेब यांच्या प्रवासाची सुरुवात अत्यंत खडतर होती. घरच्या गरिबीमुळे शिक्षण सुरू असताना त्यांना डबे पोहोचवण्याचे काम करावे लागले. डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर त्यांना L&T सारख्या प्रतिष्ठित कंपनीत नोकरी मिळाली, पण त्यांचे ध्येय काहीतरी वेगळेच होते. देशसेवेच्या स्वप्नासाठी त्यांनी नोकरीचा त्याग केला. इतकेच नाही, तर CRPF मध्ये 'असिस्टंट कमांडंट'सारखी मानाची नोकरी मिळूनही त्यांनी ती नाकारली, कारण त्यांना त्याहूनही मोठे ध्येय गाठायचे होते.
advertisement
आई-वडिलांच्या कष्टाचे फळ
जेव्हा आई दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करायची आणि वडील बांधकाम साईटवर वॉचमन म्हणून रात्रंदिवस राबायचे, तेव्हा बापूसाहेबांच्या मनात फक्त एकच ध्यास होता, तो म्हणजे UPSC. या प्रवासात अपयश, निराशा आणि अनेक अडथळे आले, पण त्यांनी हार मानली नाही. अखेर अथक मेहनत आणि जिद्दीच्या बळावर बापूसाहेब गायकवाड यांनी UPSC परीक्षेत देशात ५६१ वा क्रमांक मिळवून IPS होण्याचा मान पटकावला.
जेव्हा यश मिळाले, तेव्हा देहूरोड येथील निवासस्थानी झालेल्या सत्कार सोहळ्यात नातेवाईक आणि आई-वडिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू होते. ज्या आईने इतरांच्या घरात भांडी घासून मुलाला घडवले, तिचे कष्ट आज सार्थकी लागले होते. बापूसाहेब गायकवाड यांचा हा प्रवास हजारो तरुणांसाठी एक दीपस्तंभ आहे. गरिबी कधीच अडथळा नसते, फक्त स्वप्न पाहण्याची उमेद आणि ते पूर्ण करण्याची जिद्द हवी, हेच त्यांनी आज जगाला दाखवून दिले आहे.
