दारू पित बसले अन् पेटला वाद
बारामतीतील जुन्या मोरगाव रस्त्यावर एका अंधाऱ्या ठिकाणी तिघं मित्र एकत्र बसून दारू पीत होते. जशी नशा चढू लागली, तशी त्यांच्यात शिवीगाळ सुरू झाली आणि त्याचे रूपांतर जोरदार वादात झालं. माऊली धनंजय लोंढे याने शिवागाळ केल्याने दोन्ही मित्रांनी त्याला जीवानिशी मारलं. वाद इतका वाढला की, संतप्त झालेल्या दोघांनी बाजूला असलेला एक दगड उचलला आणि त्यांनी तिसऱ्या मित्राच्या डोक्यात दगड घालून त्याला ठेचलं. त्यांचा मित्र मरेपर्यंत दोघांनी त्याला दगडाने मारहाण केली आणि त्याचा डोक्याचा चेंदामेंदा केला.
advertisement
माऊली लोंढेचा जागीच मृत्यू
या घटनेनंतर भानावर आलेले दोन्ही आरोपी थेट पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी पोलिसांना घडलेला प्रकार सांगितला. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रात्री उशीरा घडलेल्या या घटनेत अविनाश उर्फ माऊली धनंजय लोंढे (वय 20, राहणार बारामती) याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी समीर इक्बाल शेख आणि प्रथमेश राजेंद्र दळवी या दोघांना ताब्यात घेतले आहे.
आरोपींचं आत्मसमर्पण
दरम्यान, अविनाशचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच दोन्ही आरोपींनी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर होऊन आत्मसमर्पण केलं. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला. दोन मित्रांनी दारुच्या नशेत केलेली हे क्रूर कृत्य शहरात चर्चेचा विषय ठरलं आहे.
