नेमकी घटना काय?
मृत व्यक्तीचे नाव दीपक कुमार प्रजापती (वय ४०, रा. शांतीनगर, भोसरी) असे आहे. दीपक हे आपल्या पत्नी आणि तीन मुलांसह शांतीनगर भागात वास्तव्यास होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपक यांनी आरोपी विष्णू प्रजापती (२६, रा. प्रयागराज, उत्तर प्रदेश) याच्याकडून काही पैसे उसने घेतले होते. हे पैसे परत करण्यावरून दोघांमध्ये गेल्या काही दिवसांपासून खटके उडत होते.
advertisement
नियोजित कट आणि निर्घृण हत्या:
सोमवारी सकाळी दीपक यांचा मृतदेह बैलगाडा घाट परिसरात रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे धारदार हत्याराने त्यांचा गळा चिरला होता. घटनेची माहिती मिळताच भोसरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासादरम्यान संशयाची सुई विष्णू प्रजापतीकडे वळली. मात्र, गुन्हा केल्यानंतर तो पसार झाला होता. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी त्याचा माग काढला आणि त्याला मुंबईतून अटक केली.
दीपक प्रजापती हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते भोसरी एमआयडीसी परिसरात कामगार म्हणून काम करायचे. त्यांच्या हत्येमुळे पत्नी, दोन मुले आणि एका मुलीचा आधार हरपला असून शांतीनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. भोसरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.
