गणेश कटके आणि त्यांचे सख्खे बंधू दत्तात्रय लक्ष्मण कटके हे दोघे बुधवारी (१० तारखेला) रात्री अंदाजे साडेदहा वाजता पुणे शहरातील आपले काम संपवून बोपदेव घाटातून आपल्या भिवरी गावाकडील घरी परतत होते. घाटातील दुसऱ्या वळणावर झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्या दुचाकीवर अचानक झडप मारली. बिबट्याच्या या हल्ल्यामुळे त्यांची दुचाकी रस्त्यावर कोसळली आणि यात गणेश कटके यांच्या खांद्याला मोठी दुखापत झाली.
advertisement
कटके बंधूंवर बिबट्याने हल्ला केला त्याचवेळी त्यांच्या मागून पारगाव येथील भाजप नेते गणेश मेमाणे यांची चारचाकी गाडी येत होती. गाडीच्या प्रकाशाने आणि आवाजाने घाबरलेल्या बिबट्याने तात्काळ तेथून पळ काढला. त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळल्याचे मेमाणे आणि जालिंदर वाडकर यांनी सांगितले. जखमी गणेश कटके यांच्यावर सध्या पुणे येथील भगली हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
बोपदेव आणि दिवे घाट परिसरात बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे स्थानिक नागरिक आणि भाजप नेते गणेश मेमाणे यांनी सांगितले. बिबट्या हा हिंस्त्र प्राणी असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी रात्रीच्या वेळी प्रवास करताना विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. भिवरी गावच्या सरपंच मोनाली कटके आणि उपसरपंच मारुती कटके यांनी या बिबट्याचा त्वरित बंदोबस्त व्हावा यासाठी वनविभागाला लेखी पत्र दिले आहे.
बोपदेव आणि दिवे घाट परिसर हा पुरंदर आणि हवेली तालुक्याच्या जंगल सीमेवरील भाग आहे. त्यामुळे या भागात बिबट्यांचा वावर पूर्वीपासून आहे, अशी माहिती पुरंदर तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी सागर ढोले यांनी दिली. वन खात्यामार्फत त्या भागातील नागरिकांना सुरक्षितता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. बिबट्याचा पुढील वावर आणि धोका पाहून पिंजरा बसवण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे ढोले यांनी स्पष्ट केले.
