या प्रकरणी तीन हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या होत्या. पण आता नितीन गिलबिले हत्याकांडात मोठा ट्विस्ट आला आहे. या सगळ्या घटनेचा मास्टर माइंड एक माजी नगरसेवक असल्याची माहिती समोर आली आहे. किसन तापकीर असं या माजी नगरसेवकाचं नाव आहे. त्यानेच नितीन गिलबिले यांची हत्या घडवून आणली, अशी खळबळजनक माहिती समोर आली आहे.
advertisement
या पूर्वी पोलिसांनी अमित जीवन पठारे (वय ३५, रा. पठारेमळा, चऱ्होली), विक्रांत सुरेश ठाकूर (रा. सोळू, ता. खेड) आणि सुमीत फुलचंद पटेल (वय ३१, रा. गायकवाडनगर, दिघी) अशा तीन जणांना अटक केली होती. या या सगळ्यात माजी नगरसेवक किसन तापकीर यांचंही नाव समोर आलं आहे. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटकेतील आरोपींनी माजी नगरसेवक किसन तापकीर यांचं नाव घेतल्याचं पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला आहे. अद्याप तापकीर सापडले नसून दिघी पोलीस आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे गुन्हे शाखेचे पथक त्यांचा शोध घेत आहे. जमिनीच्या व्यवहारातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
नेमकी घटना काय घडली होती?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी, १२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी अलंकापुरम रस्त्यावर गिलबिले आणि त्यांच्या ओळखीतील काही जण थांबलेले असताना अमित पठारे आणि विक्रांत ठाकूर हे फॉर्च्युनर कारमधून तेथे आले. त्यांनी नितीन गिलबिले यांना कारमध्ये बसवून त्यांच्या डोक्यात जवळून गोळी झाडली. गिलबिले यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी त्यानंतर पसार झाले. या खुनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र, तपासादरम्यान तापकीर यांचे नाव आरोपींकडून समोर येत असल्याने तपासाची दिशा बदलली आहे.
