मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पराभूत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारावर काही अज्ञात तरुणांच्या टोळक्याने भर बाजार चौकात हल्ला केला. प्रथम त्याचा पाठलाग करण्यात आला आणि नंतर सार्वजनिक ठिकाणी बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा पहिला व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता दुसरा व्हिडिओ समोर आल्याने या मारहाणीचा थरार अधिक स्पष्ट झाला आहे.
advertisement
कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न
विशेष म्हणजे, दुसऱ्या व्हिडिओमध्येही हल्लेखोरांची चेहरे आणि घटनास्थळ स्पष्ट दिसत असतानाही दौंड पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. राजकीय वैरातूनच हा हल्ला झाल्याचा आरोप संबंधितांकडून करण्यात येत आहे.
पोलिसांकडून आंदोलनाचा इशारा
या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी दौंड पोलीस ठाण्यासमोर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भर चौकात उमेदवारावर हल्ला होत असेल आणि त्याचे व्हिडिओ पुरावे उपलब्ध असतानाही पोलीस गप्प बसत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. पोलिसांकडून काही कारवाई झाली नाही, तर आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.
दौंड पोलिसांकडून चौकशी सुरू
दरम्यान, दौंड पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संशय अधिक गडद होत आहे. आरोपींवर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
