पुण्यातील कोंढवा भागात राहणाऱ्या एका महिलेसोबत ही घटना घडली आहे. यात घरगुती गॅस पुरवठा बंद करण्याची धमकी देऊन सायबर चोरट्यांनी महिलेची 2 लाख 88 हजारांची फसवणूक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेला 10 नोव्हेंबरला दुपारी एक वाजण्याच्या सुमारास एक कॉल आला. यावेळी तिला सांगण्यात आलं, की आम्ही गॅस कंपनीतून बोलत आहे. तुमचं गॅसचं बिल अपडेट झालेलं नाही. तुम्ही ते बिल भरलं नाही, तर रात्री बारा वाजेनंतर गॅस कनेक्शन तोडलं जाईल.
advertisement
हे सर्व सांगून तिच्या मोबाईलवर एपीके (APK) फाईल पाठवण्यात आली. ती फाईल डाउनलोड करण्यास सांगण्यात आलं. या माध्यमातून नेट बँकिंगसह डेबीट कार्डचा ॲक्सेस मिळवला आणि काही मिनिटांतच सायबर चोरट्यांनी महिलेच्या खात्यातून ऑनलाईन 2 लाख 88 हजार रुपये वळवले. काही वेळातच आपल्या खात्यातील रक्कम मोठ्या प्रमाणात कमी झाल्याचं महिलेच्या लक्षात आलं. यानंतर तिने त्याच नंबरवर कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच महिलेनं मदतीसाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली आहे.
