पुणे: स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांजी 14 मे हा जयंती दिवस संपूर्ण भारतभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जातो. एक छत्रपती म्हणून त्यांची कारकीर्द झंझावाती राहिली. छत्रपती संभाजीराजेंनी लिहिलेला बुधभूषण हा ग्रंथ म्हणजे मराठी इतिहासातील एक मौल्यवान साहित्यसंपदा आहे. हा ग्रंथ फक्त धार्मिक किंवा काव्यात्मक नाही, तर राज्यकारभार, नीतिशास्त्र, प्रशासन आणि प्रजेच्या कर्तव्यांपर्यंतचा व्यापक अभ्यास केलेला पाहायला मिळतो. याबाबतच अभ्यासक निलेश भिसे यांनी माहिती दिलीये.
advertisement
बुधभूषण ग्रंथाचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये
बुधभूषण ग्रंथात राजनीती शास्त्राचे महत्त्व अधोरेखित केले आहे. संभाजी महाराजांनी महाभारत (शांती पर्व), अर्थशास्त्र यांसारख्या 33 प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास करून या ग्रंथाची रचना केली. या ग्रंथामुळे सातशे वर्षांनी खंडित झालेली एक महान परंपरा पुन्हा उभी राहिली. ग्रंथात राजा, मंत्री, सेनापती, प्रजा यांचे कर्तव्य अत्यंत स्पष्टपणे मांडले आहेत. रोजच्या जीवनात एक नागरिक, सेवक किंवा राज्यकर्ता कसा वागावा याचे मार्गदर्शन मिळते. बुधभूषण मध्ये 884 श्लोक आहेत आणि तो तीन अध्यायांमध्ये विभागलेला आहे. तिसरा अध्याय मात्र आज अपूर्ण स्वरूपात उपलब्ध आहे.
सगळ्याच विषयांमध्ये 35 टक्के मार्क कसे पडले? अभ्यास कसा केला? सोलापूरच्या पोराने सगळं सांगितलं...
धार्मिकता आणि इतिहास यांचा संगम
या ग्रंथात प्रभू श्रीराम, श्रीकृष्ण, शिवशंकर, गणपती यांच्या स्तुतीपर श्लोक आहेत. शिवाजी महाराज, शहाजी महाराज आणि भोसले कुळाचे गौरवपूर्ण वर्णन केले आहे. अखंड भारताचे स्वप्न, जे शिवाजी महाराजांचे होते, त्याचेच प्रतिबिंब संभाजी महाराजांच्या विचारांतून दिसते. त्यांनी या विषयी दोन श्लोक ग्रंथात लिहिले आहेत.
संभाजी महाराजांची अभ्यासू वृत्ती आणि साहित्य निर्मिती
छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर ज्येष्ठ शुद्ध द्वादशी 14 मे 1657 रोजी झाला. 1674 साली, वयाच्या 17 व्या वर्षी त्यांनी बुधभूषण ग्रंथ लिहायला सुरुवात केली आणि पुढील दोन वर्षांत तो पूर्ण केला. ही एक अत्यंत कठीण आणि साधनेसाध्य कामगिरी होती, असं भिसे सांगतात.
प्रशासनशास्त्र आणि नीतिनियमांचे वर्णन
या ग्रंथात राज्याची करप्रणाली, दुर्गनीती, हेरखाते, कर संकलन, घोड्यांच्या व हत्तींच्या शाळा, कोष व्यवस्थापन आणि राजसेवकाचे गुणधर्म यासारख्या विषयांचे सविस्तर वर्णन आहे, अशी माहिती अभ्यासक निलेश भिसे यांनी दिली आहे. दरम्यान, बुधभूषण ग्रंथ केवळ संभाजी महाराजांची विद्वत्ता नव्हे, तर त्यांच्या राष्ट्रनिष्ठेचे आणि विचारसंपन्नतेचे जिवंत उदाहरण मानला जातो.