पुणेकरांच्या पैशांची उधळण! 2 कोटीचे कपडे 9 वर्षांपासून धूळ खात पडले, असा उघड झाला 'प्रताप' अन् 20 अधिकाऱ्यांना दणका
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
महापालिकेने 2015-16 च्या सुमारास चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी गणवेश, साड्या आणि इतर साहित्य खरेदी केले होते. यासाठी कंत्राटदारांचे २ कोटींहून अधिक रुपयांचे बिलही अदा करण्यात आले
पुणे: पुणे महानगरपालिकेच्या अनागोंदी कारभाराचा एक नमुना समोर आला आहे. तब्बल 9 वर्षांपूर्वी खरेदी केलेले 2 कोटी रुपयांचे गणवेश, साड्या आणि इतर साहित्य कर्मचाऱ्यांना वाटलेच नसल्याचे उघड झाले आहे. हे साहित्य वडगाव बुद्रुक येथील एका अभ्यासिकेत धूळ खात पडून आहे. या गंभीर निष्काळजीपणाची दखल घेत महानगरपालिका आयुक्तांनी 20 आजी-माजी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते हेमंत संभूस यांनी हा प्रकार उघडकीस आणला होता. महापालिकेने 2015-16 च्या सुमारास चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसाठी गणवेश, साड्या आणि इतर साहित्य खरेदी केले होते. यासाठी कंत्राटदारांचे २ कोटींहून अधिक रुपयांचे बिलही अदा करण्यात आले. मात्र, हे साहित्य संबंधित कर्मचाऱ्यांपर्यंत पोहोचवण्याऐवजी वडगाव बुद्रुक येथील सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत साठवून ठेवण्यात आले आणि प्रशासन ते वाटण्यास विसरले.
advertisement
तपासात काय समोर आलं?
महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या तक्रारीची दखल घेत अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. दिवटे यांनी सादर केलेल्या अहवालात तक्रारीतील तथ्य समोर आलं आहे. 9 वर्षे उलटल्यामुळे आता या कपड्यांची अवस्था खराब झाली असून ते वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत. या प्रकरणी जबाबदार असलेल्या २० कर्मचाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. यामध्ये काही निवृत्त अधिकाऱ्यांचाही समावेश असून त्यांनाही नोटीस बजावण्यात आली आहे.
advertisement
महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंत्राटदाराला पैसे वेळेवर मिळाले होते, त्यामुळे यात थेट आर्थिक भ्रष्टाचारापेक्षा प्रशासकीय अनास्था आणि कर्तव्यात कसूर असल्याचे दिसून येते. मात्र, करदात्यांच्या २ कोटी रुपयांच्या साहित्याची अशा प्रकारे धूळधाण झाल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. संबंधितांकडून समाधानकारक उत्तर न मिळाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 08, 2026 11:36 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुणेकरांच्या पैशांची उधळण! 2 कोटीचे कपडे 9 वर्षांपासून धूळ खात पडले, असा उघड झाला 'प्रताप' अन् 20 अधिकाऱ्यांना दणका








