पारंपरिक फराळाचा सुगंध, बाजारपेठेतील दिवाळीची लगबग आणि नव्या पिढीची गोडी लक्षात घेऊन पुण्यातील नामांकित मूर्ती बेकरीने यंदा दिवाळीनिमित्त एक आगळावेगळा उपक्रम सुरू केला आहे. तब्बल 88 वर्षांपासून पुणेकरांच्या चवीचा गोड वारसा जपणाऱ्या या बेकरीत चॉकलेटचे फटाके, चॉकलेटचे किल्ले आणि चॉकलेटचा फराळ उपलब्ध करून दिला जात आहे.
दरवर्षी दिवाळी म्हटली की घराघरात फराळाचे पदार्थ तयार होतात .चकली, करंजी, लाडू, चिवडा... मात्र यंदा मूर्ती बेकरीने हाच पारंपरिक फराळ आधुनिक रूपात साकारला आहे. चॉकलेट बेसवर तयार केलेले मिनी फटाके, अनार, फुलबाज्या, तसेच चॉकलेटचा किल्ला हे आकर्षण ठरत आहे. विशेष म्हणजे हे सर्व पदार्थ पूर्णपणे खाद्यपदार्थांपासून तयार केलेले असून कोणतेही कृत्रिम रंग किंवा केमिकल नसलेले आहेत.
advertisement
मूर्ती बेकरीचे संचालक विक्रम मूर्ती सांगतात, ''दिवाळी ही आनंदाची, गोडीची आणि एकत्र येण्याची सण आहे. आजच्या मुलांना फटाके आवडतात, पण प्रदूषण आणि धोक्यामुळे पालक त्यांना परवानगी देत नाहीत. त्यामुळे आम्ही ‘चॉकलेट फटाक्यां’चा पर्याय आणला, जे तितकेच आकर्षक आणि सुरक्षित आहेत.''
बेकरीमध्ये चॉकलेट लाडू, करंजी, चिवडा, शेव, तसेच 'चॉकलेट अनार आणि रॉकेट'या विशेष डिझाईनमध्ये तयार केलेल्या गिफ्ट पॅकची विक्री जोरात सुरू आहे. पुणेकर ग्राहक या अनोख्या चॉकलेट फराळाला प्रचंड प्रतिसाद देत आहेत. सोशल मीडियावरही या ‘चॉकलेट दिवाळी’ची जोरदार चर्चा सुरू असून, अनेकांनी याला “परंपरा आणि आधुनिकतेचा सुंदर संगम” असे संबोधले आहे.