उदयविहार – एस. पी. कॉलेजसमोर
टिळक रस्त्यावर असलेल्या उदयविहारचे पोहे आजही तेवढेच प्रसिद्ध आहेत. दुनियादारी चित्रपटातही या ठिकाणाचा उल्लेख आला आहे. इथल्या पोह्यांसोबत दिली जाणारी खास हिरवी चटणी हीच खरी ओळख. सकाळच्या वेळी इथे खवय्यांची नेहमीच गर्दी असते.
उडुपी पोहे – शनिवारवाड्यासमोर
शनिवारवाड्यासमोरील उडुपी रेस्टॉरंटमध्ये सकाळी पोह्यांसाठी वेटिंग लागतं. भरपूर पोहे त्यावर सांबार आणि नारळाची चटणी घालून सर्व्ह केले जातात. पोह्यांचे पार्सल नेण्यासाठी अनेक खवय्ये खास हजेरी लावतात.
advertisement
आम्ही पोहेकर – पत्र्या मारुती चौक, नारायण पेठ
नाव जसे तसंच पदार्थ. इथे तब्बल 16 प्रकारचे पोहे मिळतात. अवघ्या 20 रुपयांत पोटभर पोहे खाता येतात. फक्त पोहेच नाही तर पोहे वडे, पोहे कटलेटसुद्धा अप्रतिम लागतात. तर्री पोहे, दही पोहे, भेळ पोहे आणि कोकणी पोहे हे जरूर चाखावेत.
अमृततुल्य – नळस्टॉप
रात्री अडीचपासून सकाळी सातपर्यंत पोह्यांचा आनंद घ्यायचा असेल तर नळस्टॉपवरील हे ठिकाण परफेक्ट आहे. जरी इथे इतर पदार्थही मिळतात, तरीही ओळख मिळाली आहे ती गरमागरम, चविष्ट पोह्यांमुळेच. तरुणाईची इथे नेहमीच गर्दी असते.
बिपीन स्नॅक्स सेंटर – गरवारे कॉलेजसमोर
इथली साबुदाणा खिचडी आणि शिरा प्रसिद्ध असले तरी पोहे अजूनही टॉप क्लास मानले जातात. मऊसूत, वाफाळलेले पोहे खाण्याचा आनंद खऱ्या पोह्यांच्या चाहत्यांना वेगळाच भासतो. पुण्यातील या खास ठिकाणी एकदा पोहे खाल्ले की ''सकाळ पोह्यांनीच उजाडते'' हे वाक्य अगदी खरं वाटतं