अमन शेख आणि अरबाज पटेल यांनी दोन अल्पवयीन मुलांच्या मदतीने हा खून केला. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी अमन शेख, अरबाज पटेल आणि मयूर वाघमारे अशा तीन आरोपींना अटक केली. कोंढवा पोलिसांनी मयत गणेश काळेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल केला. या हत्या प्रकरणानंतर आता गणेश काळे खून प्रकरणातील महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. आपला मर्डर होणार असल्याची चाहूल गणेश काळेला आधीपासूनच लागली होती, अशी धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, गणेशोत्सव काळात आणि मागील 10 ते 15 दिवसांपासून गणेश हा अस्वस्थ असल्याचे त्याच्या वडिलांना जाणवले होते. याबाबत त्यांनी गणेशच्या आईला सांगितले होते. दोन दिवसांपूर्वी रिक्षा चालवून घरी आल्यावर एकत्रित जेवण करत असताना दोघांनी गणेशला त्याबाबत विचारणा केली होती. त्यावेळी गणेशने आपल्या कुटुंबाला आंदेकर टोळीकडून आपला पाठलाग होत असल्याचं सांगितलं होतं.
तसेच गणेश काळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड दहशतीखाली होता. वनराजच्या टोळीतील लोक सूड घेतील, अशी भीती त्याला सतावत होती. आपली पत्नी आणि आई-वडिलांकडेही त्याने ही भीती व्यक्त केली होती.
‘बंडू आंदेकर याने तर स्वतःच्या नातवालाही सोडलं नाही, मग तो मला कशाला सोडेन?’ अशी भीती गणेशनं जेवणाच्या ताटावर आपल्या बायकोकडे आणि आई वडिलांकडे व्यक्त केली होती. यानंतर सर्वांनी मिळून सावधगिरी बाळगण्याचं ठरवलं होतं. त्याचे वडील त्याला रोज फोन करून आणि घरी आल्यावर त्याच्याकडे चौकशी करत होते, परंतु पाठलाग थांबला नसल्याचेही त्याने पुन्हा सांगितले होते.
