आता या प्रकरणाची एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. या हत्येमागं पुण्यातील ससून रुग्णालयाचं कनेक्शन समोर आलं आहे. ससून रुग्णालयामध्येच गणेश काळेच्या हत्येची सुपारी फिक्स झाल्याची माहिती समोर येत आहे. कारण इथेच काही दिवसांपूर्वी आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर आणि गणेश काळेचे हल्लेखोर यांच्यात भेट झाली होती. त्याच भेटीत गणेश काळेच्या हत्येची सुपारी दिल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, गणेश काळेच्या हत्येच्या काही दिवसापूर्वी कृष्णा आंदेकरला वैद्यकीय तपासणीसाठी पुण्यातील ससून रुग्णालयात आणल्याची माहिती आहे. त्या वैद्यकीय तपासणी दरम्यान गणेश काळेच्या हत्या प्रकरणातील आरोपींनी थेट ससूनमध्ये जाऊन कृष्णा आंदेकरची भेट घेतली होती. याच भेटीची सध्या पुण्यात चर्चा आहे. याच भेटीत गणेश काळेच्या हत्येची सुपारी देण्यात आली का? असा संशय व्यक्त केला जातोय.
कारण गणेश काळेची हत्येचा मास्टरमाइंड आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकर आणि मुलगा कृष्णा आंदेकर हेच असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. त्यामुळे याच भेटीत गणेशच्या हत्येची सुपारी दिली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
विशेष म्हणजे कोणत्याही आरोपीची प्रकृती बिघडली असेल तर कारागृहातून त्या आरोपीला पुणे पोलीस ससून रुग्णालयात घेऊन येतात. त्या आरोपीवर नजर ठेवायची जबाबदारी पोलिसांची असते. त्यांची तपासणी होईपर्यंत पोलिसांना तिथेच थांबावं लागतं आणि तपासणीनंतर त्या आरोपीला थेट कारागृहात घेऊन जाऊन तिथे नोंद करावी लागते. असं असतानाही हे हल्लेखोर कृष्णा आंदेकरला कसे भेटले? यामागे पोलिसांचा हलगर्जीपणा आहे का? असा सवालही आता उपस्थित होत आहे.
