पुणे: प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील हिच्या कारने पुण्यात 30 सप्टेंबरला एका रिक्षा चालकाला जोराची धडक दिली. या अपघातात रिक्षा चालक गंभीर जखमी झाला. त्यामुळे गौतमी पाटील सध्या वादाच्या केंद्रस्थानी आहे. दरम्यान, गौतमी पाटीलच्या अटकेची मागणी देखील झाली. भाजप नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी थेट डीसीपीला फोन लावून गौतमी पाटीलला उचलायचं की नाही? असं विचारलं. या सगळ्या प्रकारानंतर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माध्यमांसमोर आतापर्यंतच्या प्रकरणाची माहिती दिली आहे. तसंच, अपघाताच्या वेळी गौतमी कारमध्ये नव्हती, असंही स्पष्ट केलं.
advertisement
पुण्यातील वडगाव बुद्रुक परिसरात 30 सप्टेंबर २०२५ रोजी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला होता. गौतमी पाटीलच्या मालकीच्या असलेल्या कारने रस्त्यावर उभ्या असलेल्या रिक्षाला धडक दिली होती. या अपघातात रिक्षाचालक सामाजी विठ्ठल मरगळे जखमी झाले होते. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. या प्रकरणी मरगळे कुटुंबीयांनी गौतमी पाटील हिच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी आता पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी पोलिसांची भूमिका मांडली.
'गौतमी पाटील कार अपघात प्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाईल, गरज पडली तर गौतमी पाटील यांना देखील चौकशीसाठी बोलवू. या प्रकरणी एक आरोपी ताब्यात आहे, अपघात झाला, त्यावेळी कारमध्ये कारचालक एकटा होता. गौतमी कारमध्ये नव्हती. आरोपी कारचालक भोर वरून पुण्याकडे येत असताना अपघात झाला. गाडी गौतमी पाटील यांच्या नावावर आहे, गाडी जप्त केली आहे, अशी माहिती कदम यांनी दिली.
तसंच, या चालकाची मेडिकल केली आहे. सगळे CCTV तपासले आहेत, सगळ्या प्रत्यक्षदर्शी लोकांची साक्ष नोंदवण्यात येईल, या प्रकरणी सगळी कारवाई करू. सगळा तपास सविस्तर होईल, लोकप्रतिनिधी म्हणून चंद्रकांत पाटील यांनी सगळी माहिती जाणून घेतली आहे, असंही कदम यांनी सांगितलं.
गौतमीला नोटीस पाठवली
दरम्यान, ज्या वाहनाने रिक्षाला धडक दिली ते वाहन गौतमी पाटीलच्या नावाने असल्यामुळे सिंहगड रोड पोलिसांनी तिला नोटीस पाठवली आहे. या अपघात प्रकरणी चौकशी साठी हजर रहावं, असे या नोटीस मध्ये बजावण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
