सांगवीतील प्रवाशांची वणवण थांबणार
मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सांगवी हे एक प्रमुख ठिकाण आहे. जिथे असलेल्या बाबूरावजी घोलप महाविद्यालयाजवळ स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या नव्या पीएमपी बसथांब्यावर अखेर बस थांबण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना आणि रहिवांशाना मोठा दिलासा मिळाला आहे.
या आधी जुन्या बसथांब्याची अवस्था अत्यंत खराब झाली होती तसेच नवीन बसथांबा तयार होऊनही तेथे बस थांबत नसल्याने प्रवाशांना रस्त्यावर उभे राहून बसची वाट पाहावी लागत होती. अखेर पीएमपी प्रशासनाने याची दखल घेत नव्या बसथांब्यावर बस थांबवण्याचा निर्णय घेतला.
advertisement
गेल्या काही महिन्यांपासून जुन्या बसथांब्यामुळे सांगवी फाटा परिसरात वारंवार वाहतूक कोंडी होत होती. सायंकाळच्या वेळी परिस्थिती अधिक बिकट होत असे. बसचालकांनीही सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला होता. आता रक्षक चौक ते सांगवी फाटा या मार्गावर वाहनांचा वेग कमी करण्यासाठी गतिरोधक बसवण्यात आले आहेत.
स्थानिक नागरिक आणि महिला प्रवाशांकडून समाधान व्यक्त
नवीन बसथांब्यासमोरील अतिक्रमणे यापूर्वीच हटवण्यात आली आहेत. यामुळे बस सहज थांबू शकतात आणि प्रवाशांनाही सुरक्षितपणे चढ-उतार करता येते. स्थानिक नागरिक आणि महिला प्रवाशांनी या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
