योगेश भालेराव असं हल्ला करणाऱ्या मुख्य आरोपीचं नाव आहे. तर प्रेम लक्ष्मण वाघमारे आणि अन्य एक अल्पवयीन अशी ताब्यात घेतलेल्या तीन आरोपींची नावं आहेत. तर हल्ला झालेली तरुणी ही आरोपी योगेश भालेरावची प्रेयसी असल्याची माहिती आहे. प्रेम प्रकरणातून झालेल्या वादातून संतापलेल्या योगेशने आपल्या दोन साथीदारांच्या मदतीने १८ वर्षीय प्रेयसीवर कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितलं आहे.
advertisement
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमसंबंधातील वाद विकोपाला गेल्यानंतर योगेश भालेराव याने आपल्या दोन साथीदारांना सोबत घेतले. या तिघांनी संगनमत करून तरुणीला गाठले आणि तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. या जीवघेण्या हल्ल्यात तरुणीच्या डोक्यावर, मानेवर आणि हातावर गंभीर वार करण्यात आले. ज्यामुळे ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. भरदिवसा झालेल्या या घटनेमुळे हिंजवडी परिसरात मोठी खळबळ उडाली.
या घटनेची माहिती मिळताच हिंजवडी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि तिन्ही संशयित आरोपींना त्वरित ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत, हा सर्व प्रकार प्रेमसंबंधातून निर्माण झालेल्या वैमनस्यातून घडल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणीला तातडीने हिंजवडी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून, तिची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी तिच्यावर लक्ष ठेवले आहे. तरुणी ही मूळची नाशिकची असून सध्या ती हिंजवडीतील साखरे वस्ती परिसरात वास्तव्याला होती.
