सुप्रिया सुळे म्हणाल्या, हिंजवडीमध्ये डंपर ट्रक आणि आरएमसी ट्रक नियमबाह्य वेळेत रस्त्यावर धावतात, निवासी भागात आर एम सी प्लांट आहेत. पी एम आर डी ए ने मोकळ्या केलेल्या रस्त्यांवर अजूनही स्क्रॅप, राडारोडा आहे., तसेच रस्त्यावरील खड्डे अजूनही बुजवण्यात आले नाही. हिंजवडीमध्ये कोट्यावधी रुपयाचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय होतो, इथून कंपन्या परराज्यात जात आहेत. मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना हात जोडून विनंती करते की, हिंजवडीकडे हाय प्रायोरिटीने लक्ष घाला, अन्यथा गणपतीनंतर आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू...
advertisement
सुप्रिया सुळेंची राज्य सरकारवर टीका
12 ऑगस्टला हिंजवडी परिसरामध्ये प्रत्युषा संतोष बोराटे या अकरा वर्षाच्या चिमुकलीचा डंपर ट्रक खाली चिरडून दुर्देवी मृत्यू झाला होता. याबाबत सुप्रिया सुळे यांनी आज मान परिसरातील जॉय विले सोसायटीमध्ये जाऊन बोराटे कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली.या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर हिंजवडीच्या प्रश्नावरून बोचरी टीका केली आहे.
अजित पवार देखील अॅक्शन मोडमध्ये
हिंजवडीमधील होत असलेल्या ट्रॅफिकमुळे आयटी क्षेत्रातील मोठ्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर जाऊ लागल्या आहेत. त्यामुळेच आता पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनीच तातडीने उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे अजित पवार यांनी राजीव गांधी आयटी पार्क, हिंजवडी येथील विविध नागरी समस्यांबाबत पाहणी केली. तसेच, पुणे मेट्रो फेज ३ कामाची व वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या विविध उपयोजनांची पाहणी करून प्रशासनास आवश्यक सूचना केल्या होत्या.