'या' दिवशी करता येणार मोफत तपासणी
हे मोफत आरोग्य शिबिर 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत घेण्यात येणार असून सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत महिला नागरिक तपासणीसाठी उपस्थित राहू शकतात. किशोरवयीन मुली, गरोदर महिला यांच्यासह सर्वसाधारण महिलांसाठी आरोग्य तपासण्या आणि समुपदेशनाची सोय या ठिकाणी उपलब्ध असेल.
शिबिरादरम्यान महिलांमध्ये वाढत चाललेल्या असंसर्गजन्य आजारांची तपासणी केली जाणार असून मधुमेह, उच्च रक्तदाब आणि गर्भाशयाचा कर्करोग, क्षयरोग, अशक्तपणा यांसह पोषण विषयक मार्गदर्शन केले जाईल. गर्भवती महिलांसाठी प्रसूतीपूर्व आवश्यक तपासण्या, रक्तदाब आणि रक्तातील साखरेची चाचणी तसेच गर्भाच्या आरोग्याशी संबंधित प्राथमिक तपासणी केली जाईल. याशिवाय लहान बालकांना नियमित लसीकरण सेवाही पुरवल्या जाणार आहेत.
advertisement
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख देवी मंदिर परिसरात विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. चतुश्रृंगी देवी मंदिर, तांबडी जोगेश्वरी मंदिर आणि भवानी माता मंदिर परिसरात होणाऱ्या या शिबिरांत महिला भक्तांसह सर्वसामान्यांना आरोग्य तपासणीची संधी मिळेल.
महिलांच्या आरोग्याशी संबंधित विविध तज्ज्ञ डॉक्टरांचीही सेवा या काळात उपलब्ध होणार आहे. स्त्रीरोग तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, नेत्ररोगतज्ज्ञ, कान-नाक-घसा तज्ज्ञ, दंत आणि त्वचारोग तज्ज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ, अस्थिरोग तज्ज्ञ, फिजिशियन आणि फिजिओथेरपिस्ट यांच्या उपस्थितीत महिलांना आवश्यक ते उपचार आणि मार्गदर्शन दिले जाणार आहे.
महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, या अभियानाचा अधिकाधिक महिलांनी लाभ घ्यावा. महिलांचे आरोग्य हे कुटुंबाच्या सुदृढतेसाठी महत्त्वाचे असल्याने योग्य तपासणी आणि वेळेवर उपचार हे आवश्यक आहे. ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ या अभियानामुळे महिलांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम संपूर्ण समाजावर होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.