प्रवाशांचा रोष असा आहे की वर्दळीच्या वेळी वाहतूक पोलिस आणि ट्रॅफिक वॉर्डन चौकात असले तरी ते कारवाई न करता बघ्याच्या भूमिकेत उभे राहतात. काहीजण तर मोबाईलमध्ये व्यस्त दिसतात. यामुळे रिक्षाचालकांची बेशिस्त वृत्ती अधिकच वाढत आहे. पोलिस असताना जर कारवाई होत नाही म्हणून रिक्षाचालकांना अजिबात भीती उरलेली नाही असे प्रवासी सांगतात.
advertisement
बसथांब्यांवर गोंधळ
निगडीतील भोसरी बसथांबा हा सकाळच्या गर्दीच्या वेळी अधिकच बिकट बनतो. रिक्षा थेट बसथांब्यावर उभ्या केल्या जातात, ज्यामुळे बसचालकांना थांबा गाठणे कठीण होते. परिणामी बस रस्त्यावर तिरक्या उभ्या राहतात आणि टिळक चौकासारख्या वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी निर्माण होते. यामुळे शेकडो प्रवाशांना बसमध्ये चढताना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. स्थानिक प्रवासी शिवराम वैद्य यांनी स्पष्ट केले की,बसचालकांनी विनंती करूनही रिक्षाचालक बाजूला सरकत नाहीत. काही वेळा रिक्षा उभ्या करून चालक तिथून निघून जातात.
मेट्रो स्थानकाजवळ नो-पार्किंगची पायमल्ली
पिंपरी मेट्रो स्थानकाजवळ परिस्थिती सर्वाधिक गंभीर आहे. जिन्याजवळच्या फुटपाथवरच रिक्षा थांबवल्या जात असल्याने पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होतो. महामार्गावरून येणारे काही रिक्षाचालक प्रवासी दिसताच गाड्या रस्त्यावरच थांबवतात. त्यामुळे महामार्गावरील गती मंदावते आणि वाहतूक कोंडीत अधिक भर पडते.
प्रवाशांवर दादागिरी, अवास्तव भाडे
मेट्रो स्थानकाबाहेर प्रवासी आल्यावर रिक्षाचालकांकडून जबरदस्तीचे प्रकार घडत असल्याची तक्रार आहे. नवीन प्रवाशांना हात धरून रिक्षेत बसवले जाते तसेच नियमित दरापेक्षा अधिक भाडे आकारले जाते. रिक्षात बसायचे की नाही हा निर्णय प्रवाशाचा असतो. पण येथे चालक प्रवाशांना गाठून गाडीत बसण्यास सांगतात अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.
पोलिस कारवाई अपुरी
वाहतूक पोलिस विभागाने मागील तीन महिन्यांत अर्थात जून, जुलै आणि ऑगस्टमध्ये एकूण 1,762 रिक्षांवर कारवाई केली आहे. म्हणजेच सरासरी 20 रिक्षांवर दररोज दंडात्मक कारवाई करण्यात आली. मात्र, मोरवाडी स्थानकाजवळ एकावेळीच 20 हून अधिक रिक्षा नो-पार्किंगमध्ये उभ्या असल्याचे चित्र दिसते.त्यामुळे ही कारवाई पुरेशी ठरत नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे.
प्रवाशांची मागणी
प्रवासी संघटनांचे मत आहे की, रिक्षाचालकांवर कठोर पावले उचलली नाहीत तर परिस्थिती आणखी गंभीर होईल. अनधिकृत थांबे बंद करून ठराविक जागी रिक्षा स्टँड उपलब्ध करून द्यावेत. तसेच वाहतूक पोलिसांनी सकाळ-संध्याकाळच्या गर्दीच्या वेळी सातत्याने गस्त घालावी अशीही मागणी होत आहे. अन्यथा प्रवाशांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण होईल.