वाहतूक कोंडीवर पोलिसांचा नेमका उपाय कोणता?
पुण्यातील विमाननगर परिसरातील वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून दोन मुख्य रस्त्यांवर एकेरी वाहतुकीचा प्रयोग राबवला जाणार आहे. पुणे शहर वाहतूक पोलिसांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. विमाननगरमध्ये नागरिकांना विशेषतहा कैलास सुपर मार्केट चौक, गणपती चौक, दत्त मंदिर चौक आणि श्रीकृष्ण हॉटेल चौक येथे सतत वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. यामुळे नागरिकांच्या त्रासावर उपाय म्हणून हा प्रयोग राबवणार आहेत.
advertisement
कशी असेल वाहतूक व्यवस्था?
विशेष म्हणजे या ठिकाणी यापूर्वीही दोन वेळा हा प्रयोग राबवण्यात आला होता, मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे तो मागे घ्यावा लागला. या नवीन प्रयोगात श्रीकृष्ण हॉटेल चौक ते दत्त मंदिर चौक मार्गे चौकापर्यंत आणि गंगापूरम चौक येथून कैलास सुपर मार्केट चौक मार्गे गणपती चौकापर्यंत एकेरी वाहतूक असेल. तसेच या दोन मुख्य रस्त्यांना जोडणारे काही रस्ते दुहेरी वाहतुकीसाठी उपलब्ध राहतील. यात श्रीकृष्ण हॉटेल चौक ते गणपती चौक, आनंद विद्यानिकेतन शाळे समोरील रस्ता, कैलास सुपर मार्केट चौक ते दत्त मंदिर चौक, तसेच गंगापूरम चौक ते सीसीडी चौक या रस्त्यांचा समावेश आहे.
एकेरी वाहतुकीचा हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर आजपासून ते १ डिसेंबर पर्यंत राबवला जाणार आहे. उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नागरिकांना विनंती केली आहे की हा प्रयोग यशस्वी व्हावा म्हणून त्यांनी नियमांचे पालन करावे आणि पोलिसांच्या सूचना गंभीरपणे पाळाव्यात.
