श्रावणीने दहावीपर्यंतचे शिक्षण महापालिकेच्या शाळेत घेतले. तिच्या शालेय कारकिर्दीतच तिची बुद्धिमत्ता, मेहनत आणि चिकाटी सतत ठळकपणे जाणवली. शिक्षकांचा मार्गदर्शन, स्वतःची जिद्द आणि पालकांचा पाठिंबा यामुळे तिने अवघ्या मर्यादित साधनांमध्येही उत्कृष्ट प्रगती साधली. दहावीच्या परीक्षेत तिने तब्बल 93 टक्के गुण मिळवत उत्तम यश मिळवले. याच कामगिरीच्या जोरावर आणि तिच्या सर्वांगीण विकासामुळे तिला जर्मनीत अकरावी-बारावीचे शिक्षण घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे.
advertisement
पुढील दोन वर्षे श्रावणी विज्ञान, गणित, अर्थशास्त्र यांसारख्या विषयांचा सखोल अभ्यास करणार आहे. UWC संस्थेत मिळणारे शिक्षण केवळ शैक्षणिकच नाही, तर जागतिक नागरिक घडवण्यावर भर देते. विविध देशांतील विद्यार्थी एकत्र येऊन शिक्षण घेत असल्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर संवाद, संस्कृतीची देवाणघेवाण आणि जागतिक समस्यांवर विचार करण्याची संधी श्रावणीस मिळणार आहे. त्यामुळे तिचा दृष्टीकोन व्यापक होणार असून, तिच्या भावी कारकिर्दीत हे पाऊल महत्वाचे ठरणार आहे.
श्रावणीच्या यशामागे तिच्या पालकांचे कष्टही तितकेच महत्त्वाचे आहेत. तिचे वडील खासगी शाळेत शिक्षक म्हणून काम करतात, तर आई खासगी कंपनीत नोकरी करते. मर्यादित उत्पन्न असूनदेखील मुलीच्या शिक्षणासाठी त्यांनी सातत्याने प्रोत्साहन दिले. आज मुलीची निवड जर्मनीतील नामांकित महाविद्यालयात झाली आहे, हे तिच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण परिसरासाठी अभिमानाचे यश आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेत शिकलेल्या विद्यार्थिनीने मिळवलेले हे यश सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. महापालिकेच्या शाळांमध्येही गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतले, मेहनत केली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी मिळवता येते, हे श्रावणीने दाखवून दिले आहे. तिच्या या वाटचालीमुळे अन्य विद्यार्थ्यांना देखील उभारी मिळणार असून, पालक आणि शिक्षकांसाठीही हे अभिमानाचे क्षण आहेत.