फसवणूक झालेला तरुण पुण्याच्या भूगाव भागामध्ये राहतो. इन्स्टाग्रामवर तरुण आणि तरुणीने एकमेकांना फॉलो केलं आणि त्यानंतर दोघांमध्ये संभाषण सुरू झालं. 7 डिसेंबरला तरुणीने फोन करून कात्रज घाटात फिरायला चल म्हणून तरुणाला गळ घातली, यानंतर तरुणही त्याची दुचाकी घेऊन कात्रज घाटात पोहोचला आणि दोघंही दुचाकीवरून निघाले. काही अंतर पार केल्यानंतर तरुणीच्या साथीदारांनी ठरल्याप्रमाणे दोघांना अडवलं आणि तरुणाला धमकावलं.
advertisement
दुचाकी घेऊन कोंढव्यातील येवलेवाडी भागात जा, अशी धमकी तरुणीच्या साथीदारांनी तरुणाला दिली. यानंतर घाबरलेला तरुण येवलेवाडीमध्ये गेला आणि तिथेही त्याला मारहाण केली गेली. तसंच तरुणीने त्याच्यावर लैंगिक शोषण आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली आणि 70 हजार रुपये मागितले. पण आपल्याकडे एवढी रक्कम नसल्याचं तरुणाने सांगितलं, अखेर तरुणी आणि तिच्या सहकाऱ्यांनी तरुणाकडून 10 हजार रुपये जबरदस्तीने घेतले.
पैसे घेतल्यानंतर तरुणी आणि तिच्या साथीदारांनी तरुणाला सोडलं, यानंतर घाबरलेल्या तरुणाने याबद्दल कुणालाही काही सांगितलं नाही. पण पैसे दिल्यानंतरही तरुणीकडून उरलेले पैसे देण्याबद्दल धमक्या दिल्या जात होत्या, त्यामुळे तरुणाने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीस तरुणी आणि तिच्या साथीदारांचा शोध घेत आहेत.
