आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार, पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांदरम्यान समन्वय साधण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीत राज्यातील गणेशोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला तसंच उत्सव सुरळीत व भव्यदिव्य पद्धतीने साजरा करण्यासाठी आवश्यक ते मार्गदर्शन करण्यात आले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या बैठकीत सांगितले की, “गणेशोत्सवाला राज्योत्सवाचा दर्जा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर एक व्यापक आराखडा तयार करण्यात आला असून तो लवकरच सार्वजनिक करण्यात येईल. सर्वांनी उत्साह, शिस्त आणि एकात्मतेने हा सण साजरा करावा.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, अलीकडील काळात गणेशोत्सवावर काही संकटं आली होती, परंतु, ती विघ्नहर्त्याच्या कृपेनं दूर झाली असून, सरकार केवळ एक निमित्त ठरलं.'
advertisement
बैठकीत पोलीस विभागाच्या भूमिकेवरही त्यांनी विशेष भर दिला. पुण्यातील विसर्जन मिरवणुका नियोजनबद्ध, शांततेत आणि वेळेत पार पडाव्यात यासाठी आवश्यक सर्व तयारी करण्यात यावी, असे त्यांनी निर्देश दिले. पोलिसांनी मंडळांसोबत सतत संपर्क ठेवून समन्वय साधावा आणि कोणत्याही प्रकारचा गोंधळ टाळावा, असेही ते म्हणाले.
मुख्यमंत्री यांनी ‘ऑपरेशन सिंदुर’ आणि विकसित राष्ट्राच्या प्रवासाचा संदर्भ देत सांगितले की, या वाटचालीत काही अडथळे येत आहेत. त्यावर मात करण्यासाठी आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी ‘स्वदेशी’ या संकल्पनेवर जनजागरण करणे अत्यंत आवश्यक आहे. स्थानिक उत्पादनांचा वापर, स्वावलंबन आणि भारतीय संस्कृतीचा गौरव या गोष्टी समाजात दृढपणे रुजवाव्यात, असं आवाहन त्यांनी सर्व गणेश मंडळे आणि नागरिकांना केलं.
बैठकीस राज्यातील विविध गणेश मंडळांचे पदाधिकारी, वरिष्ठ पोलिस अधिकारी, महापालिका प्रतिनिधी आणि प्रशासनातील अधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होतं. सर्वांनी एकत्रितपणे उत्सव यशस्वी करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं.
तसंच, 'गणेशोत्सव हा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक कार्यक्रम नसून, तो लोकांना एकत्र आणणारा, सामाजिक बंध दृढ करणारा आणि सकारात्मकतेचा संदेश देणारा महोत्सव आहे. त्यामुळे हा सण शांतता, सौहार्द आणि उत्साहाच्या वातावरणात पार पडावा, हीच सर्वांची जबाबदारी आहे, असंही मुख्यमंत्री फडणवीस शेवटी म्हणाले.