पाण्यात पडल्यावर आईने पाईप धरला, पण मुलगा हरपला
मिळालेल्या माहितीनुसार, मंचर शहरातील हर्षदा आशिष बाणखेले (वय ३५) यांचा घरात वाद झाला होता. या वादातून आलेल्या निराशेपोटी त्यांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपल्या पाच वर्षांचा मुलगा नेहांत आशिष बाणखेले याला सोबत घेत घराजवळच असलेल्या विहिरीत उडी मारली.
विहिरीत पडल्यानंतर मृत्यू डोळ्यासमोर दिसताच हर्षदा यांनी विहिरीतील एका पाईपला घट्ट धरून ठेवले आणि स्वतःचा जीव वाचवला. मात्र, याच वेळी त्यांचा चिमुरडा नेहांत हा पाण्याच्या प्रवाहात बुडाला. पाच वर्षांच्या निरागस मुलाला सावरता आलं नाही आणि त्याचा करुण अंत झाला.
advertisement
घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी विहिरीकडे धाव घेतली. हर्षदा यांना विहिरीतून बाहेर काढण्यात यश आलं, मात्र नेहांतचा मृत्यू झाला. मुलाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. एका किरकोळ घरगुती वादाचे रूपांतर अशा भीषण शोकांतिकेत होईल, अशी कल्पनाही कोणी केली नव्हती. स्वतःच्या आईच्या हातूनच मुलाचा जीव गेल्याने परिसरातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस तपास सुरू
या घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया करत आहेत. घरातील वाद नेमका कोणत्या कारणावरून झाला होता? हर्षदा यांना आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आलं होतं का? या सर्व बाजूंचा तपास आता पोलीस करत आहेत.
