नकुल भोईर यांचा खून केल्याप्रकरणी पत्नी चैताली नकुल भोईर (वय २८, रा. चिंचवड) आणि तिचा प्रियकर सिद्धार्थ दीपक पवार (वय २१, रा. चिंचवड) या दोघांनाही पोलिसांनी केली आहे. शनिवारी (दि. १ नोव्हेंबर) त्यांना पुन्हा न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी सिद्धार्थ पवारचा मोबाईल फोन अजूनही मिळवायचा आहे. हा फोन मिळाल्यास गुन्ह्यासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती आणि पुरावे मिळण्यास मदत होईल. पोलिसांची ही मागणी मान्य करत न्यायालयाने दोघांच्याही पोलीस कोठडीत रविवारपर्यंत (दि. २ नोव्हेंबर) वाढ केली आहे.
advertisement
नेमकं प्रकरण काय आहे?
पिंपरी-चिंचवडमध्ये सामाजिक कार्यात सक्रिय असलेल्या नकुल भोईर यांची काही दिवसांपूर्वी गळा आवळून हत्या झाली होती. या घटनेचा तपास करताना चिंचवड पोलिसांना नकुलची पत्नी चैताली हिच्यावर संशय आला. पोलिसांनी कसून चौकशी केली असता, चैतालीने खुनाची कबुली दिली आणि धक्कादायक सत्य समोर आले.
खुनाचे कारण काय?
चैतालीचे सिद्धार्थ पवार याच्यासोबत प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधांवरून नकुल आणि चैतालीमध्ये वारंवार वाद होत होते. याशिवाय नकुल भोईर हे चैतालीला मद्यपान न करण्याबद्दल, परपुरुषांसोबत न फिरण्याबद्दल आणि कर्ज न काढण्याबद्दल वारंवार सांगत होते, ज्यामुळे चैतालीला त्याचा राग आला होता. प्रेमसंबंधांच्या आड नकुल येत असल्याने, चैतालीने प्रियकर सिद्धार्थसोबत मिळून नकुलला कायमचे संपवण्याचा कट रचला.
दोघांनी संगनमत करून ओढणीने नकुलचा गळा आवळून खून केल्याचं पोलिसांच्या तपासात उघड झालं आहे. चिंचवड पोलिसांनी या प्रकरणात जलद गतीने तपास करत दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आता सिद्धार्थ पवारचा मोबाईल फोन हाती लागल्यास गुन्ह्याच्या अधिक तपशील उघड होण्याची शक्यता आहे.
