वाहतुकीवरील असे असतील निर्बंध
दि. 27 सप्टेंबर 2025 पासून दि. 01 ऑक्टोबर 2025 पर्यंत दररोज सकाळी 6 वाजता ते रात्री 10 वाजेपर्यंत काही मार्गांवर निर्बंध लागू राहतील.
जुना मुंबई–पुणे महामार्ग आणि पुणे–मुंबई महामार्गावरील लोणावळा कुसगाव बुद्रुक टोलनाका ते वडगाव फाटा, वडगाव मावळ या दरम्यान मोठ्या आणि अवजड वाहनांना प्रवेश बंद राहिल. लहान वाहने आणि भाविकांसाठी मात्र वाहतूक सुरू राहील.
advertisement
पर्यायी मार्ग कोणते?
मोठी आणि अवजड वाहने यांना दुसऱ्या मार्गाने वळविण्यात येणार आहे:
पुण्याकडे जाणारी वाहने :
जुन्या मुंबई–पुणे महामार्गावरील लोणावळा येथील कुसगाव बुद्रुक टोलनाक्यापासून ही वाहने थेट एक्सप्रेस हायवे वर वळवली जातील. त्यानंतर उर्से टोलनाका मार्गे ही वाहने सुरक्षितपणे पुणे शहराकडे जाऊ शकतील.
मुंबईकडे जाणारी वाहने : पुणे–मुंबई महामार्गावरील वडगाव येथील तळेगाव फाटा पासून ही वाहने वळवून उर्से खिंडीतून एक्सप्रेस हायवेवर नेण्यात येतील. त्यानंतर ही वाहने थेट मुंबईकडे जाऊ शकतील.
प्रशासनाचे आवाहन
नवरात्र उत्सवाच्या काळात लाखो भाविक कार्ला येथे दर्शनासाठी येतात. गर्दीमुळे अपघाताचा धोका तसेच वाहतूक कोंडी होण्याची शक्यता वाढते. यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी डुडी यांनी आदेश जारी केले आहेत. नागरिकांनी आणि वाहनचालकांनी प्रशासनाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. वाहतुकीचे नियोजन व्यवस्थित व्हावे, भाविकांना त्रास होऊ नये आणि सुरक्षिततेत व्यत्यय येऊ नये यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.