मात्र, पोलिसांचा हा स्तुत्य निर्णय जमिनीवर उतरवताना पेट्रोल पंपांवरील कर्मचाऱ्यांची मोठी दमछाक होत असल्याचे समोर आले आहे. अनेक वाहनचालक या नियमांना जुमानत नसून ते पंपावरील कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत आहेत. "आम्ही पैसे देतोय, मग तुम्ही पेट्रोल नाकारणारे कोण?" असा सवाल करत ग्राहक वाद घालत असल्याने कर्मचारी हतबल झाले आहेत. वादाच्या भीतीने अनेक पंपांवर नियम केवळ फलकापुरतेच उरले असून प्रत्यक्षात इंधन पुरवठा सुरूच असल्याचे चित्र दिसत आहे. पंपमालकांनी देखील आपली अडचण व्यक्त करताना सांगितले की, पोलिसांच्या सूचना असल्या तरी आम्हाला ग्राहकांवर थेट कारवाई करण्याचे किंवा त्यांना अडवण्याचे कायदेशीर अधिकार नाहीत, त्यामुळे हा नियम लागू करणे कठीण जात आहे.
advertisement
या संदर्भात वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी स्पष्ट केले आहे की, फॅन्सी नंबरप्लेट आणि काळ्या काचा असलेल्या वाहनांविरुद्धची मोहीम अधिक तीव्र केली जाणार असून लवकरच पंपचालकांना दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी होत आहे की नाही, याची तपासणी केली जाईल. दुसरीकडे, पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी सांगितले की, पोलिसांकडून मिळालेल्या पत्राबाबत असोसिएशनची समिती लवकरच पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून यातील तांत्रिक आणि व्यावहारिक अडचणींवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे.
