दर्शन राजेश जैन (वय २८, रा. कॅम्प, पुणे) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (९ डिसेंबर) फिर्याद दिली आहे. फिर्यादी राजेश जैन यांचा सोन्याच्या दागिन्यांचा व्यवसाय आहे. ते आपला कामगार भैरुसिंग जवानसिंग सोलंकी (वय २८, मूळ रा. जालोर, राजस्थान) याच्यासोबत पुणे-नाशिक महामार्गावरून दुचाकीने प्रवास करत होते.
advertisement
गुडविल चौकाजवळ रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवून फिर्यादी दर्शन जैन हे लघुशंकेसाठी बाजूच्या झाडीमध्ये गेले. त्यावेळी त्यांनी ६ लाख ४० हजार रुपये किंमत असलेले, ८० ग्रॅम २०० मिलीग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असलेली बॅग कामगार सोलंकी याच्या विश्वासार्हतेवर त्याच्या स्वाधीन केली. जैन परत येण्यापूर्वीच सोलंकी याने त्यांच्या विश्वासाचा भंग करत सोन्याची बॅग घेऊन तिथून पळ काढला. या घटनेमुळे सराफ व्यावसायिकाला मोठा धक्का बसला आहे. भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फरार आरोपी भैरुसिंग सोलंकी याचा शोध पोलीस घेत आहेत.
