नेपाळचा सराईत पोलिसांच्या जाळ्यात
प्रकाश तेज विश्वकर्मा (वय २०, सध्या राहणार चक्रपाणी वसाहत, भोसरी; मूळ राहणार नेपाळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रकाश हा सराईत गुन्हेगार असून त्याला येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन या गुन्ह्यांचा तपास करण्यात आला. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांच्या सूचनेनुसार शहरात राबवल्या जाणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत ही मोठी कारवाई करण्यात आली आहे.
advertisement
महाळुंगे एमआयडीसी परिसरातून सातत्याने दुचाकी चोरीच्या तक्रारी येत होत्या. वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ आणि निरीक्षक अनिल देवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या आधारे संशयिताचा माग काढला. चौकशी दरम्यान, आरोपीने महाळुंगे एमआयडीसी आणि परिसरातून चार दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तसेच, तपासादरम्यान त्याने एका घरफोडीचा गुन्हा केल्याचेही समोर आले. पोलिसांनी त्याच्याकडून चोरीच्या चारही दुचाकी आणि घरफोडीतील सोन्याचे पदक असा एकूण १ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
पोलीस उपायुक्त श्वेता खेडकर यांनी या कारवाईचे कौतुक केले असून, औद्योगिक पट्ट्यातील चोरीच्या घटना कमी करण्यासाठी पोलिसांचे गस्ती पथक अधिक सतर्क करण्यात आले आहे.
