उत्तर प्रदेशातून कामानिमित्त पुणे परिसरात स्थायिक झालेले राम वर्मा आणि त्यांच्या पत्नी राधा वर्मा (वय २७) या दाम्पत्याच्या आयुष्यात आठ वर्षांनी मातृत्व येणार होतं. अनेक वर्षांच्या वैद्यकीय उपचारानंतर राधा यांना गोड बातमी मिळाली होती आणि तपासणीत जुळे बाळ असल्याचं समजल्यावर कुटुंबाचा आनंद गगनात मावत नव्हता. मात्र, मंगळवारी (९ डिसेंबर) तळवडे चौकाजवळ म्हसोबा मंदिरासमोर झालेल्या पीएमपी बसच्या धडकेने त्यांची सर्व स्वप्नं क्षणात भंग पावली.
advertisement
दुपारी दीडच्या सुमारास राधा वर्मा आणि त्यांच्यासोबत असलेली बहीण सुधा बिहारीलाल रस्ता ओलांडत असताना पीएमपीच्या ई-बसने त्यांना धडक दिली. या अपघातात सुधा हिचा जागीच मृत्यू झाला. तर, गर्भवती असलेल्या राधा वर्मा गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले, मात्र या भीषण धडकेमुळे राधा यांच्या गर्भातील जुळ्या बाळांचा दुर्दैवी अंत झाला.
राधा यांचे पती राम वर्मा यांनी आपली व्यथा व्यक्त करताना सांगितलं की, पत्नीला जपत ते दर गुरुवारी वैद्यकीय तपासणीसाठी भोसरीतील रुग्णालयात जायचे. सर्व काही सुरळीत असताना नियतीने घात केला. या अपघातानंतर राम वर्मा यांच्यावर पत्नीच्या उपचारासाठी धावाधाव करण्यासोबतच पिता होण्याचं स्वप्न भंगल्याचंही मोठं दुःख सहन करण्याची वेळ आली. या हतबल घटनेनं अनेकांचे डोळे पाणावले असून, या दुःखावर कोणताच उपाय नाही. मात्र, तळवडे रस्त्यावरील अपघातांचे वाढते गांभीर्य लक्षात घेऊन शासकीय व्यवस्थेने तातडीने कठोर उपाययोजना करण्याची गरज यानिमित्ताने समोर आली आहे.
