मागील काही दिवसांपासून PMPML बसेसच्या अपघाताचं प्रमाण वाढलं आहे आणि चालकांच्या हलगर्जीपणामुळे आणि चालकांच्या निष्काळजीपणामुळे हे अपघात वाढतं असल्याची माहिती आहे. त्यामुळेच आता बसचालकांच्या आणि कंडक्टर यांच्या संदर्भात PMPML प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ड्रायव्हिंग करताना मोबाईल-हेडफोन वापरास बंदी घालण्यात आली आहे. या नियमाचे उल्लंघन केल्यास थेट निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वाहतूक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा मोठा निर्णय घेतला आहे.
advertisement
वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठा निर्णय
पीएमपीचे चालक सिग्नल जम्पिंग, भरधाव वेगाने बस चालविणे, झेंब्रा क्रॉसिंगवर बस थांबवणे, मोबाईल फोनवर बोलत बस चालवणे अशा विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करताना दिसून येतात. काही चालक तर कानाला हेडफोन लावून चालवत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या, त्यानंतर चालकांच्या अशा असुरक्षीत वर्तनााबाबत PMPML ने गंभीर चिंता व्यक्त करत केली. त्यानंतर वाहतूक सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मोठा निर्णय घेतला आहे.
कंडक्टर - ड्रायव्हरसाठी PMPML ने नवे नियम काय?
- शहरात बस चालवताना चालकांना त्यांचे फोन कंडक्टरकडे सुपूर्द करावे लागणार आहे. विशेष म्हणजे शिफ्ट संपेपर्यंत हे मोबाईल चालकांना मिळणार नाही.
- नव्या नियमांचे पालन केले नाही तर चालकांचे तात्काळ निलंबन केले जाणार आहे.
- हा आदेश PMPML अंतर्गत कार्यरत खाजगी बस कंत्राटदारांवर ही लागू होणार आहे डेपो मॅनेजरने याची काटेकोर दक्षता घ्यायला सांगितली आहे.
अखेर पीएमपीएमएलने घेतली दखल
काही महिन्यांपूर्वी पीएमपीएमएल ड्रायव्हरचा अनोखा प्रताप समोर आला होता. पुणेकर ड्रायव्हरने कानात हेडफोन घातला. मोबाईलवर मालिका लावली अन् आपल्या समोरच्या जागेवर मोबाईल ठेवला. वाहतूक कोंडीच्या शहरात ड्रायव्हरने केलेल्या या प्रकाराची पुणे पीएमपीएमएल प्रशासन दखल घेणार की नाही? त्या ड्रायव्हरवर कारवाई होणार का ? असा प्रश्न पुणेकरांना पडला होता. अखेर पीएमपीएमएलने दखल घेत नवे नियम लागू केले आहे.