पुणे : प्राचीन काळापासूनच डाळिंब हे एक लोकप्रिय फळ मानले जाते. अनेक जण जेवणात या फळाचा समावेश करतात. शरीरालाही या फळाचे अनेक फायदे आहेत, असे सांगितले जाते. त्यामुळे बाजारपेठेत 12 महिने या फळाला चांगली मागणी असते.
सध्या डाळिंबाची आवक घटली आहे. त्यामुळे पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये चांगल्या डाळिंबाला प्रतिकिलो साधारण 350 रुपयांपर्यंत दर मिळत आहे. यामागची नेमकी कारणे काय आहेत, याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा आढावा.
advertisement
डाळिंबाचे वेगवेगळे ग्रेड असून त्याचे दर हे कमी-जास्त असलेले पाहायला मिळत आहेत. साधारण 200 रुपयांपासून ते 350 रुपयांपर्यंत प्रतिकिलो दर मिळत आहेत. सध्या आता गणेशोत्सव तोंडावर असल्याने अजून किंमती वाढणार असल्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे पुढील काळात अजून आवक कमी झाली तर हेच दर प्रतिकिलो 450 रुपयांपर्यंत जाऊ शकतात. त्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
डाळिंबात A, B, C ग्रेड मध्ये 200 रुपयांपासून ते 300 ते 350 रुपये पर्यंत प्रतिकिलो दर मिळत आहे. चौथ्या, पाचव्या ग्रेडला परराज्यातून जास्त मागणी असल्यामुळे गोटी मालाला 100 ते 120 रुपये प्रतिकिलो दर आहेत.
यंदाच्या हंगामात सफरचंदाची आवक महाराष्ट्रामध्ये कमी आहे. त्यामुळे डाळिंबाचे दर हे चांगले आहेत. त्याच प्रमाणे डाळिंबाची शेती करणं खूप अवघड आहे. कारण डाळिंबावर रोगाचा प्रादुर्भाव झालेला दिसत आहे. तर हार्वेस्टिंगसाठी 6 महिन्याचा कालावधी लागत आहे. यामध्ये अवकाळी पाऊस याचा प्रादुर्भाव पडतो आहे. यामुळे स्पॉट, डाग, तेल्या व्हायरस हे जास्त प्रमाणात येत आहेत.
पुण्यातील गुलटेकडी मार्केटमध्ये बारामती, इंदापूर, अकलूज, छत्रपती संभाजीनगर या भागातून प्रामुख्याने माल येत आहे. आता साधारण 200 ते 350 रुपये पर्यंत प्रतिकिलो मालाची विक्री ही केली जात आहे. गणपतीनंतर याचे दर वाढून 250 ते 450 रुपये पर्यंत जाण्याचा अंदाज आहे. दररोज मार्केटमध्ये 10 ते 12 हजार कॅरेटची आवक होत आहे. डाळिंब हे टिकाऊ फळ असल्यामुळे या फळाला जास्त मागणी वाढत आहे, अशी माहिती डाळिंबाचे व्यापारी श्रीपाद अनपट यांनी लोकल18 शी बोलताना दिली.