नेमकी घटना काय?
मयत तरुणाचं नाव राजा यल्लापा लाकडे (वय २५, रा. वैदुवाडी, हडपसर) असे आहे. सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राजा लाकडे रामटेकडी येथील किर्लोस्कर उड्डाणपुलावरून रस्ता ओलांडत होता. याचवेळी कर्नाटकहून सोलापूरच्या दिशेने जाणारी भरधाव एसटी बस तिथे आली. उड्डाणपुलावर अंधार असल्याने आणि वाहनांचा वेग जास्त असल्याने चालकाला रस्ता ओलांडणारा राजा दिसला नाही आणि बसने त्याला जोरदार धडक दिली.
advertisement
दीड वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न: अपघात इतका भीषण होता की, एसटी बसचे चाक राजाच्या अंगावरून गेलं. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेऊन राजाला गाडीखालून बाहेर काढलं आणि शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मृत घोषित केलं. राजा याचं अवघ्या दीड वर्षांपूर्वीच लग्न झालं होतं. त्याच्या निधनामुळं वैदुवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.
वानवडी पोलिसांनी याप्रकरणी एसटी चालक आमल्या आयप्पा क्रियाळ (वय ५८, रा. शहापूर, कर्नाटक) याला ताब्यात घेऊन अटक केली आहे. उड्डाणपुलावरील अंधार आणि पादचाऱ्यांसाठी रस्ता ओलांडण्याच्या सोयीचा अभाव यांमुळे हा बळी गेल्याची चर्चा घटनास्थळी नागरिक करत होते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
