जावेद पठाण पुण्यात एका खाजगी ठिकाणी काम करत होता. याच दरम्यान त्याची ओळख नांदेडच्याच भोकर परिसरातील एका तरुणीशी झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. मात्र, तरुणीच्या नातेवाईकांना हे संबंध मान्य नव्हते आणि त्यांनी याला तीव्र विरोध दर्शवला होता. याच वादाचा वचपा काढण्यासाठी आरोपींनी हत्येचा कट रचला.
advertisement
सोमवारी (२२ डिसेंबर) सायंकाळी पावणेसातच्या सुमारास जावेद आंबेगावमधील गायमुख परिसरात थांबलेला असताना, मुख्य आरोपी आणि त्याच्या साथीदाराने त्याला गाठले. "तिच्यासोबतचे प्रेमसंबंध कायमचे तोडून टाक," असे म्हणत आरोपींनी जावेदशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि संतापलेल्या आरोपींनी आपल्याजवळील तीक्ष्ण शस्त्राने जावेदवर सपासप वार केले.
रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या जावेदला तातडीने एका खाजगी रुग्णालयात आणि त्यानंतर ससून रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, गंभीर जखमांमुळे रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते आणि सहाय्यक आयुक्त राहुल आवारे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी आणि त्याचा मित्र सध्या पसार असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन चोरमले या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
