पुण्यात विचित्र प्रकार! गोड बोलून विश्वास जिंकला; महिलेनं चोरट्यांना स्वतःच काढून दिल्या सोन्याच्या बांगड्या, मग..
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
दांडेकर पूल परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या या प्रकारात चोरट्यांनी महिलेच्या हातातील सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या लंपास केल्या
पुणे: सोन्या चांदीच्या दागिन्यांच्या किमती भरपूर वाढल्या आहेत. त्यामुळे दागिने चोरीच्या घटनाही दररोज समोर येत आहेत. पुण्यातून आता अशीच आणखी एक घटना समोर आली आहे. शहरात ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करणाऱ्या भामट्यांचा सुळसुळाट झाला आहे. दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने एका ६५ वर्षीय महिलेची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे. दांडेकर पूल परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या या प्रकारात चोरट्यांनी महिलेच्या हातातील सुमारे १ लाख ८० हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या दोन बांगड्या लंपास केल्या. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार ज्येष्ठ महिला रविवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दांडेकर पूल परिसरातील जय महाराष्ट्र मित्रमंडळाजवळून जात होत्या. यावेळी तीन अनोळखी व्यक्तींनी त्यांना अडवले आणि आम्ही जुने दागिने किंवा पितळेच्या वस्तू नवीनसारख्या पॉलिश करून देतो, असे सांगून संवाद साधला. या भामट्यांनी त्यांच्याकडील एका खास द्रव पदार्थाचा वापर करून एक पितळाची वस्तू चमकवून दाखवली. त्या वस्तूचा लखलखाट पाहून महिलेचा त्यांच्यावर विश्वास बसला.
advertisement
महिलेचा विश्वास संपादन केल्यानंतर चोरट्यांनी त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन बांगड्या पॉलिश करण्यासाठी मागून घेतल्या. महिलेने बांगड्या काढून देताच, चोरट्यांनी नजर चुकवून त्या स्वतःकडे ठेवल्या आणि क्षणात तिथून पळ काढला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने आरडाओरडा केला, मात्र तोपर्यंत चोरटे पसार झाले होते.
advertisement
या घटनेची माहिती मिळताच पर्वती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. या टोळीने अशाच प्रकारे अन्य काही ठिकाणी फसवणूक केली आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत. ज्येष्ठ नागरिकांनी अनोळखी व्यक्तींच्या अशा भूलथापांना बळी पडू नये, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 11:50 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
पुण्यात विचित्र प्रकार! गोड बोलून विश्वास जिंकला; महिलेनं चोरट्यांना स्वतःच काढून दिल्या सोन्याच्या बांगड्या, मग..











